मूकबधिर झाले डोळे, अंध झाला कान !
By Admin | Updated: October 25, 2015 00:05 IST2015-10-25T00:05:22+5:302015-10-25T00:05:22+5:30
अंध असलेला तो दोन मूकबधिरांचे कान झाला अन् मूकबधिर असलेले ते दोघे अंध मुलाचे डोळे झाले.

मूकबधिर झाले डोळे, अंध झाला कान !
अशीही मिसाल : जन्मदात्यांनी नाकारले, शंकरबाबांनी घडविले
गजानन मोहोड अमरावती
अंध असलेला तो दोन मूकबधिरांचे कान झाला अन् मूकबधिर असलेले ते दोघे अंध मुलाचे डोळे झाले. धडधाकट शरीर लाभलेल्यांना भुरळ पाडणारी ही दोस्ती आज अमरावतीच्या रस्त्यावर अनुभवता आली.
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य बाल सुधारगृहातील १२३ अनाथांचा बाप असलेल्या शंकरबाबा पापळकर यांचा २३ वर्षीय मुलगा विदूर पंढरपूकरच्या विठ्ठल मंदिरात आढळला. हा अंध युवक अमरावती येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या पदवी शिक्षणक्रमाचा विद्यार्थी आहे. नियमित विद्यार्थ्याप्रमाने त्याने मागील वर्षी १२वीची परीक्षा दिली. ६३ टक्के गुण मिळविले. गायनाचा छंद असलेल्या विदुरने संगीताच्या पाच परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. वझ्झर येथील समाजगृहातील अनिल व समीर हे दोन मुकबधीर युवक विदुरचे डोळे बनलेत आहेत.
अंध विदूर अनिल आणि समिरची वाणी आणि कान बनला आहे. एकमेकांच्या अवयवांच्या साहाय्याने त्यांची नाना समस्यांवर मात सुरू आहे. अनिल २३ वर्षांचा. मुंबई येथील डोंगरी भागातील एका नालीत तो सापडलेला. समीर सोलापूर रेल्वे स्थानकावर आढळला.
वयाच्या १८ वर्षांनंतर काय ?
अमरावती : अनिल हा बालसुधार गृह परिसरातील. १० हजारांवर झाडांना नियमित पाणी देतो. मोबाईल, टिव्ही, आदी उपकरांनीची दुरुस्ती सहजरित्या करतो. सजावट व कलाकुसरीत त्याचा हातखंडा. समिर हा सकाळी सर्व मुलामुलींना उठवितो. त्यांचे दात घासून देतो. तयारी करुन देतो.
अलिकडेच शंकरबाबांनी संस्थेची बरीचसी कामे विदूरवर सोपविली आहेत. पुणे येथील समाज कल्याण आयुक्तांकडे विदूर एकटाच जातो. अधिकाऱ्यांशी चर्चा करतो, असे शंकरबाबानी गौरवाने सांगितले. शासन निर्णयानुसार बाल सुधारगृहात केवळ १८ वर्षापर्यंत मुलामुलींना राहता येते. त्यानंतर या मुलींचे काय होते? हा प्रश्न हृदय हेलावणारा आहे. शंकरबाबांनी विदूरला संस्थेत काळजीवाहकपदावर नेमून त्याचे पुनर्वसन केले. अनिल व समिरचेही ते पुनर्वसन करणार आहेत.