डफरीनप्रकरणी १३५ पानी चौकशी अहवाल प्राप्त
By Admin | Updated: December 22, 2014 22:39 IST2014-12-22T22:39:14+5:302014-12-22T22:39:14+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजातांच्या मृत्यू प्रकरणातील चौकशी पूर्ण झाली असून राणी राऊत यांच्या प्रकरणाचा अहवाल पूर्ण तर रिझवाना जावेद शहा यांच्या बाळाचे मृत्यू प्रकरण मेडिकल

डफरीनप्रकरणी १३५ पानी चौकशी अहवाल प्राप्त
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजातांच्या मृत्यू प्रकरणातील चौकशी पूर्ण झाली असून राणी राऊत यांच्या प्रकरणाचा अहवाल पूर्ण तर रिझवाना जावेद शहा यांच्या बाळाचे मृत्यू प्रकरण मेडिकल बोर्डकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.
जिल्हा स्त्री रुग्णालयात १३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. याबाबत 'लोकमत'ने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्याने सर्वत्र ठिकठिकाणी याची चर्चा झाली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे निर्देश उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांना दिले होते. तो चौकशी अहवाल जिल्हाधिकारी गित्ते यांना शुक्रवार १९ डिसेंबर रोजी प्राप्त झाला. या १३५ पानांच्या या चौकशी अहवालात अनेकांचे बयाण नमूद आहेत. राणी बन्सी राऊत (२०) यांचा बाळ अल्ट्रा सोनोग्राफीनुसार साडेसहा महिन्यांचा असल्याने व गर्भात त्याची व्यवस्थत वाढ झालेली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तो गर्भपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दुसऱ्या प्रकरणात रिझवाना जावेद शहा यांचा बाळ दगावण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्राथमिक चौकशीनुसार रिझवाना जावेद शहा या १२ नोव्हेंबर रोजी डफरीनमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यांना ब्लड शुगरचा आजार असल्याने नॉर्मल प्रसूतीचा करण्याचा डॉक्टरांनी प्रयत्न केला. कारण अशा अवस्थेच सिझेरीयन केल्यास रुग्णांच्या जीवाला धोका अधिक असतो. त्यामुळे प्रसूतीला विलंब करावा लागला. परिणामी बाळ पोटातच दगावले, असे चौकशी अहवालात नमूद आहे. त्यावरून दोष कुणाचा हे स्पष्ट होत नसल्याने याप्रकरणी पुढील चौकशीची जबाबदारी मेडिकल बोर्डाकडे वर्ग करण्यात आली असून त्यामध्ये चार तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत बाळ मृत्यूचे कारणमीमांसा केली जाईल. तो अहवाल काही दिवसांत प्राप्त होणार असून त्यावरून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.