मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रस्ते चकाकले
By Admin | Updated: July 19, 2015 00:09 IST2015-07-19T00:09:37+5:302015-07-19T00:09:37+5:30
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या एका दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रस्ते चकाकले
रस्त्याची डागडुजी : साफसफाई, पथदिव्यांची कामे युद्धस्तरावर
मनीष कहाते अमरावती
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या एका दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. त्याकरिता शहरातील रस्ते, विविध मार्गावरील पथदिवे आणि साफसफाईचे कामे युध्दस्तरवर सुरु आहे.
एरवी सामान्य नागरिकाला रस्ता दुरुस्त करण्यासाठी शेकडो निवेदने द्यावी लागतात. वर्षानुवर्ष प्रतीक्षा केल्यानंतरही रस्ता दुरुस्त होत नाही. साफसफाई होत नाही, तर बंद पडलेले पथदिवेही लागत नाहीत. परंतु मुख्यमंत्र्यांचे केवळ एक दिवस काही तास शहरात वास्तव्य राहणार असताना त्यासाठी मात्र तत्काळ निधीची उपलब्धता करुन रात्रभरात साफसफाई आणि रस्त्यांची कामे केली जात आहेत.
रविवारी सकाळी बेलोरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. तेथून सर्किट हाऊस अमरावती येथे येणार आहे. वाटेत लागणारा बडनेरा ते अमरावती मार्ग संपूर्ण चकाचक करण्यात आला आहे. रस्त्यावर पांढऱ्या रेषा मारण्यात आल्या आहेत. मार्गावरचे सिग्नल तत्काळ दुरुस्त करण्यात आले आहेत. त्याकरिता निधी कसा आला हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. सांस्कृतिक भवन येथे मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्या मार्गावर कित्येक दिवसांपासून साफसफाई करण्यात आलेली नव्हती. मात्र ती एका दिवसात करण्यात आली. याच मार्गावरील पथदिवेसुध्दा बऱ्याच दिवसांपासून बंद होते ते तत्काळ सुरु करण्यात आले. आजपर्यंत रस्त्यावरची साफसफाई करण्यात आली नाही, याचे उत्तर कोणाकडेही नाही. याच मार्गावर नवीन झाडे, रस्त्याच्या मध्यभागी तत्काळ लावण्यात आली आहेत. त्या झाडांना पाणी देण्याचेही काम सुरु आहे. इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय चौक आदी चौकांची काळजीपूर्वक साफसफाईची कामे सुरु आहेत. रस्त्याच्यामध्ये असलेल्या तुटलेल्या कुंड्या हटविण्याचे काम सुरु आहे.
मुख्यमंत्री येणार म्हणून नवीन असे कोणतेही कामे करण्यात आले नाही. जे सुरु आहेत ते नियमित कामे आहेत.
- एस.आर. जाधव, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती.
शहरातील प्रमुख रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. त्यामुळे दुरुस्ती व देखभाल ते करतील.
-रवींद्र पवार, उपअभियंता, बांधकाम विभाग, अमरावती महानगरपालिका.
सामान्यांनी व्हीआयपींची प्रतीक्षा करावी काय?
जनतेच्या करातूनच शासनाचा कारभार चालतो. मात्र रस्ते, नाल्यांची निर्मिती, पायाभूत सोईसुविधा, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना प्रशासकीय पायऱ्या झिजवाव्या लागतात. तरीदेखील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार १९ जुलै रोजी अमरावतीत येत असल्याच्या पार्श्वभूमिवर रस्ते निर्मिती, डागडुजी व वाहतूक दिशादर्शक पट्टे आदी विकासकामे युद्धस्तरावर सुरु आहेत. आवश्यक त्या ठिकाणी रंगरंगोटी, अनावश्यक खर्च करण्याचा धडाकादेखील प्रशासनाने लावला आहे. एकीकडे सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल असून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त अवास्तव खर्च होत असल्याने कमालीची नाराजी बघावयास मिळत आहे; तथापि एखादा रस्ता, नाली बांधकामाची अनेक वर्षांपासून मागणी करणाऱ्या सामान्यांना ती पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा व्हीआयपी येण्याची प्रतीक्षा करावी लागेल काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. अशातच मुख्यमंत्री हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी येत असताना प्रशासन त्यांच्या दौऱ्यावर अवास्तव खर्च करीत असल्याने संतप्त प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटू लागल्या आहेत.