व-हाडातील साडेसहा हजार गावांमध्ये दुष्काळस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:15 IST2018-01-01T20:14:55+5:302018-01-01T20:15:18+5:30
यंदाच्या खरीप हंगामात विभागात लागवडीयोग्य ७ हजार २१५ गावांत खरिपाची अंतिम पैसेवारी सोमवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केली.

व-हाडातील साडेसहा हजार गावांमध्ये दुष्काळस्थिती
गजानन मोहोड
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात लागवडीयोग्य ७ हजार २१५ गावांत खरिपाची अंतिम पैसेवारी सोमवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केली. यामध्ये ६ हजार ५२४ गावांना न्याय देण्यात आला. या गावांत ४८ पैसेवारी आहे. उर्वरित ६९१ गावांमध्ये पीक स्थिती उत्तम असल्याचा जावईशोध महसूल विभागाने लावला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६४२, तर वाशिम जिल्ह्यातील १९ गावांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
प्रचलित धोरणानुसार, अमरावती विभागात खरिपाची अंतिम पैसेवारी ही १५ जानेवारीला जाहीर केली जाते. मात्र, गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला पैसेवारी जाहीर करावी, असे आदेश महसूल विभागाने दिले. यंदा ३१ डिसेंबरला रविवार असल्याने दुसरे दिवशी सोमवारी पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामुळे विभागातील ६,५२४ गावातील उद्ध्वस्त खरिपावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच पावसाच्या सरासरीत कमी व सलग खंड राहिला. यंदाच्या पावसाळ्यात १२० दिवसांपैकी जूनमध्ये ९, जुलै १२, आॅगस्ट ९ व सप्टेंबर महिन्यात ८ असे एकूण ३६ दिवस पाऊस पडला. बुलडाणा जिल्ह्यात ९९, तर उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये पावसाची ७६ टक्केवारी राहिली. कमी पावसाने मूग, उडीद व सोयाबीनसारखी अल्प कालावधीतील पिके बाद झालीत. शासनस्तरावर तुरीचे पीक हे रबीमध्ये गृहीत धरले जाते. त्यामुळे शेतकºयांची सर्व दारोमदार कपाशीवर असताना, पात्या-फुलांवर आलेल्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा मोठा अटॅक झाला. यामध्ये विभागातील किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशी उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी नुकसानाची पातळी ९६ टक्क्यांपर्यंत असल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यात स्पष्ट झाले. शेतातील उभ्या कपाशीवर शेतकºयांनी रोटाव्हेटर फिरविला. शासनाने पंचनाम्याचे आदेश देऊन जिरायती क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत ३० हजार ८०० रुपये किमान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा केली. आता जिल्ह्यात दुष्काळस्थितीच स्पष्ट झाल्याने शासन याव्यतिरिक्त कोणत्या सोयी-सुविधा जाहीर करते, याकडे लक्ष लागले आहे.
अशी आहे जिल्हानिहाय पैसेवारी
विभागात लागवडीयोग्य ७,२१५ गावे आहेत. यापैकी ६,५२४ गावांत सरासरी ४८ पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १,९६३ गावात ४६ पैसे, अकोला जिल्ह्यातील ९९० गावांमध्ये ४४ पैसे, यवतमाळ जिल्ह्यात २,०४९ गावांमध्ये ४७ पैसे, वाशिम जिल्ह्यातील ७७४ गावांमध्ये ४७ पैसे व १९ गावांमध्ये ५० पैशांच्या वर तसेच बुलडाणा जिल्ह्यात ७४८ गावात ५० पैशांपेक्षा कमी, तर ६७२ गावांत ५० पैशांच्या वर ५५ पैसे अशी पैसेवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जाहीर केली. या सर्व गावांमध्ये दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागू झाला आहे