अंबा एक्स्प्रेसमध्ये तळीरामांचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:54+5:30
भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी बुधवारी दिलेल्या तक्रारीनुसार, रेल्वे सेवा ही सार्वजनिक असून, डबा, प्लॅटफार्म वा रेल्वे स्थानकावर कोणतीही सामाजिक हानी होणारी बाब करता येत नाही. अंबा एक्स्प्रेसमध्ये १६ सप्टेंबर रोजी ही गाडी मुंबईकडे अमरावतीहून सायंकाळी ७.२० वाजता रवाना झाली.

अंबा एक्स्प्रेसमध्ये तळीरामांचा धिंगाणा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबईकडे जाणाऱ्या अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात चक्क मद्यपान करून सहा ते सात तळीरामांनी सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा केल्याची घटना शेगाव रेल्वेस्थानकानजीक १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी भीम ब्रिगेड या संघटनेने मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे प्रबंधकांना डब्यातील छायाचित्रांसह तक्रार सादर करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एसी डब्यातील प्रवासही आता असुरक्षित झाल्याचे यातून स्पष्ट होते.
भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी बुधवारी दिलेल्या तक्रारीनुसार, रेल्वे सेवा ही सार्वजनिक असून, डबा, प्लॅटफार्म वा रेल्वे स्थानकावर कोणतीही सामाजिक हानी होणारी बाब करता येत नाही. अंबा एक्स्प्रेसमध्ये १६ सप्टेंबर रोजी ही गाडी मुंबईकडे अमरावतीहून सायंकाळी ७.२० वाजता रवाना झाली. या गाडीत काही रेल्वे कर्मचारी कार्यरत होते. ही गाडी अकोल्याहून पुढे शेगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच वातानुकूलित डबा क्रमांक बी-१ मध्ये सहा ते सात जण अर्धवट कपड्यांमध्ये मद्यपान करून वाढदिवस साजरा करीत होते. त्यांच्याकडून पाच ते सहा दारूच्या बॉटल रिचविण्यात आल्या. त्यांच्या सोबतीला एक ते दोन कर्मचारीदेखील होते. मद्यपान करीत त्यांनी अक्षरश: धिंगाणा घातला. परिणामी मुंबईकडे सहकुटुंब प्रवास करणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एसी डब्यातील तिकीट निरीक्षकांनी या तळीरामांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत नमूद आहे. एसी डब्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचाऱ्यांना ही बाब दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रेल्वे डब्यात मद्यपानाची सूट दिली कोणी?
रेल्वे डब्यात सामान्य प्रवासी कचरा किंवा धूम्रपान करताना आढळून आल्यास त्याच्याकडून जबर दंड आकारण्याची तरतूद रेल्वे प्रशासनात आहे. मात्र, वातानुकूलित डब्यात तळीरामांसोबत रेल्वे कर्मचारी सहभागी होऊन केक कापतात आणि दारू प्राशन करतात; या गंभीर बाबीची दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी केली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना डब्यात दारू प्राशन करण्यासारख्या असभ्य वर्तनाची सूट कोणी दिली, या दिशेने तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अमरावती एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात काही जणांनी दारू प्राशन केल्याबाबतची तक्रार भीम ब्रिगेडकडून प्राप्त झाली आहे. हे निवेदन डीआरएमकडे पाठविले जाईल. यात कोणते कर्मचारी सहभागी झालेत, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधितावर कारवाई केली जाणार आहे.
- एम.एस. लोहकरे
उपप्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक .