लोकमत न्यूज नेटवर्कवरुड/पुसला : विवाह विधी आटोपला अन् सुखी संसाराला सुरुवात झाल्याचा आनंद नवपरिणित दाम्पत्यासह उपस्थित वऱ्हाडींनी व्यक्त केला. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन तासांत नवरदेवाचा आकस्मिक मृत्यू झाला आणि लग्नमंडपातील हर्षोल्हासाचे वातावरण दुःखात परिवर्तित झाले. ही घटना वरुड तालुक्यातील पुसला येथे मंगळवारी दुपारी घडली.
अमोल प्रकाश गोडबोले (३२, रा. पुसला), असे मृत नवरदेवाचे नाव आहे. तो पुसला येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून सेवा देत होता. त्याचा विवाह नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील २६ वर्षीय युवतीशी ठरला होता. मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्याच्या लग्नाच्या तयारीसाठी गावातील सर्वांनीच हातभार लावला होता. पुसला येथील मंगल कार्यालयातच २५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता सनई-चौघडे वाजले. मंगलाष्टके झाली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सुलग्न लावण्यासाठी जो-तो व्यासपीठावर येण्यासाठी उत्सुक होता.
सुमारे दोन तास झालेले असताना गाठजोड्यात खुर्चीवर बसलेला नवरदेव अमोल हा खाली कोसळला. त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. नातेवाइकांनी त्याला खासगी रुग्णालयात हलविले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, अमोलचे पार्थिव शवविच्छेदनानंतर पुसला येथे आणण्यात आले. सायंकाळी लग्नासाठी गोळा झालेल्या वन्हाडींच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
औटघटकेचे ठरले लग्न
पुसला येथील अमोलच्या घराजवळच मंगल कार्यालय असल्याने वधूपक्षाने मंगल कार्यालयाची शोधाशोध करण्याऐवजी पुसला येथेच विवाह सोहळा आयोजित करण्याबाबत दोन्ही पक्षांचे एकमत झाले होते. विवाहाच्या दोन तासांतच नवरदेव दगावल्याने वधूपक्षाकडील मंडळीही सैरभैर झाली होती. अखेर काही जणांनी वधूसह मंडळींना मोवाडला परत जाण्यास सुचविले.
Web Summary : In Pusla, tragedy struck as a groom, Amol Godbole, died of a heart attack just two hours after his wedding. Celebrations turned to mourning as the newlywed's life ended abruptly, leaving the community in shock.
Web Summary : पुसला में, शादी के दो घंटे बाद दूल्हे अमोल गोडबोले की दिल का दौरा पड़ने से मौत हो गई। नवविवाहित जोड़े का जीवन अचानक समाप्त होने से उत्सव शोक में बदल गया, जिससे समुदाय सदमे में है।