डोजला उशीर झाला तरी घाबरू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST2021-05-11T04:13:07+5:302021-05-11T04:13:07+5:30
अमरावती : चार लसींची मागणी असताना, अत्यल्प डोज मिळत असल्याने जिल्ह्यात लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे, ज्या नागरिकांनी ...

डोजला उशीर झाला तरी घाबरू नका!
अमरावती : चार लसींची मागणी असताना, अत्यल्प डोज मिळत असल्याने जिल्ह्यात लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे, ज्या नागरिकांनी पहिला डोज घेतलेला आहे, त्यांना दुसरा डोज मिळण्यास अडचण निर्माण झालेली आहे. मात्र, दुसऱ्या डोजला उशीर झाल्यास घाबरू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ७६ हजार नागरिकांना झालेला आहे. रोज नवीन भागात कोरोनाची नोंद होत आहे. कोरोनाचा संसर्ग खंडित करायचा असल्यास त्रिसूत्रीच्या पालनासह लसीकरण महत्त्वाचे आहे. याद्वारे समाजात ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होऊन कोरोनाचा प्रतिबंध करता येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १३५ केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. यामध्ये १३ केंद्रे महापालिका क्षेत्रात आहेत. मात्र, सुरुवातीपासूनच लसींचा तुटवडा असल्याने सर्व केंद्रे कधीही सुरू असल्याचे दिसून आलेले नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत ३,४१,१०० डोज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २,६९,१८० कोविशिल्ड, तर ७१,९२० कोव्हॅक्सिनच्या डोजचा समावेश आहे. जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ‘हेल्थ केअर वर्कर’ या गटात आतापर्यंत ३०,२५५ जणांनी लस घेतलेली आहे. दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्या ‘फ्रंट लाईन वर्कर’मध्ये ३०,२५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आले. याशिवाय १८ ते ४४ वर्षे वयोगटात ऑनलाईन नोंदणी व अपाॅईन्टमेंट घेतलेल्या १५,८३९ जणांना लसीचा पहिला डोज देण्यात आला आहे. यानंतर ४४ ते ५९ वर्षे वयोगटातील १,०३,१६६ नागरिकांना लस देण्यात आली, तर ६० वर्षांवरील १,५४,२३० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.
बॉक्स
सहा ते आठ आठवड्यांनी कोविशिल्डचा दुसरा डोज
लसीच्या दोन डोजमध्ये चार ते सहा आठवड्यांचे अंतर असावे, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. त्यानुसार सुधारित गाईड लाईन आल्या. त्यानुसार कोविशिल्डच्या दोन डोजमध्ये सहा ते आठ आठवड्यांचे अंतर हवे. पहिला डोज घेतल्यानंतर शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागत असल्याचे सांगण्यात आले. कोव्हॅक्सिन लस चार ते सहा आठवड्यांनी घ्यावी लागते.
बॉक्स
नागरिकांमध्ये संभ्रम, लसीकरणासाठी चकरा
तुटवड्यामुळे कधी, कोणत्या लसी मिळतील व कोणत्या वयोगटासाठी त्याचसोबत कोणत्या डोजसाठी लस मिळणार, याविषयी आरोग्य विभागाद्वारे निश्चत असे सांगण्यात येत नसल्यामुळे नागरिकांना या केंद्रावरून त्या केंद्रावर अशा चकरा घालाव्या लागत असल्याचे दिसून येते.
* ज्या नागरिकांचा लसीचा पहिला डोज झालेला आहे, त्यांचा विहित कालावधी पूर्ण झाल्यामुळे दुसऱ्या डोजसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही नागरिक तर सकाळी ५ पासून लसीकरण केंद्रासमोर रांगा लावत आहेत. कोणी शहर सोडून लस घेण्यासाठी ग्रामीण केंद्रावर जात आहे.
कोट
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या डोजमध्ये सहा ते आठ आठवड्यांचे अंतर अपेक्षित आहे. मात्र, दुसऱ्या डोजला थोडा उशीर झाला तरी घाबरण्याचे काही कारण नाही. यामध्ये कोणताही धोका नाही. लसीकरण सुरक्षित आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक
पाईंटर
एक नजर लसीकरणावर
पहिला डोज घेतलेले दुसरा डोज घेतलेले
१८,३१९ आरोग्य सेवक ११,९३८
२०,५१९ फ्रंटलाईन वर्कर १०,२१५
१,२१,८३१ ज्येष्ठ नागरिक ३२,३९९
९०,३५७ ४५ पेक्षा जास्त वयोगट १३,१०९