‘लॉकडाऊन नको, आम्हाला जगू द्या!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:41+5:302021-04-07T04:13:41+5:30
अमरावती : शासनाने सोमवारी रात्री ८ पासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनविरोधात मंगळवारी येथील व्यापारी, दुकानांमध्ये कार्यरत कामगारांनी ‘लॉकडाऊन नको, आम्हाला ...

‘लॉकडाऊन नको, आम्हाला जगू द्या!’
अमरावती : शासनाने सोमवारी रात्री ८ पासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनविरोधात मंगळवारी येथील व्यापारी, दुकानांमध्ये कार्यरत कामगारांनी ‘लॉकडाऊन नको, आम्हाला जगू द्या!’ अशी आर्त हाक शासन, प्रशासनाला दिली. राजकमल चौकात त्यांनी निदर्शने केले, तर महापालिका प्रवेशद्वारावर नारेबाजी करण्यात आली.
लॉकडाऊन जाहीर होताच दुकाने, प्रतिष्ठाने बंद केली जातात. त्यामुळे कामगारांचा रोजगार हिरावला जातो. अतिशय बिकट परिस्थितीत जगण्यासाठी त्यांना मनाची तयारी करावी लागते. शासन, प्रशासन लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी एकवटतात. कठोर नियमांचे पालन करण्यास भाग पाडतात. तथापि, कामगारांना रोजगार मिळावा, यासाठी कोणीच ‘ब्र’ काढत नाही. लॉकडाऊनमध्ये व्यापारी अथवा दुकानदारांनी कामगारांना वेतन मिळावे, अशी सक्ती का करत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, कामगारांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी माजी महापौर विलास इंगाेले यांनी पुढाकार घेतला. कामगारांचे प्रश्न जाणून घेतले आणि लवकरच अमरावतीत लॉकडाऊन शिथिल होण्यासाठी शासनाकडे मागणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यादरम्यान महापालिका उपायुक्त रवी पवार यांनीसुद्धा कामगारांची समजूत काढली. मात्र, आता लॉकडाऊन नको, यावर कामगार ठाम होते.
---------------------
दुकान बंद तर वेतन बंद, जगावे कसे?
दुकाने, प्रतिष्ठाने बंद असल्यास कामगारांना वेतन दिले जात नाही. गतवर्षी लॉकडाऊनचा अनुभव वाईट आहे. काही कामगारांना उपाशी राहावे लागले. आता लॉकडाऊनची मानसिकता नाही. पुढे २५ दिवस कसे जगावे, जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदीसाठी पैसे कोठून आणावे, कुटुंबातील आजारी व्यक्तींना औषध कसे खरेदी करावे, अशा विविध समस्यांची यादी आनंद आमले यांनी मांडली. यावेळी अमर ठकरवार, मंगेश कांबे, अर्शद खान, समीर शाह, मतीन खान, सुनील कडू, गजानन महल्ले, कमलेश चौधरी आदी उपस्थित होते.
-----------------
राजकमल चौकात कामगारांचा आक्रोश
‘कोरोनाने मरू द्या, पण उपाशी मरू शकत नाही’, असा आक्रोश राजकमल चौकात कामगारांनी व्यक्त केला. लॉकडाऊन हा पर्याय नाही, लसीकरणाची सक्ती करा, अशी मागणी कामगारांनी केली. दुकाने बंद असल्यामुळे रोजगार कसा, कुठून मिळवावा, याचे उत्तर शासन, प्रशासनाने द्यावे, असे कामगार म्हणाले.