घरपोच सिलिंडरचे वजन करता का?
By Admin | Updated: May 30, 2015 00:34 IST2015-05-30T00:34:13+5:302015-05-30T00:34:13+5:30
स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची मर्यादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीलाा ...

घरपोच सिलिंडरचे वजन करता का?
गॅस चोरीची शक्कल न्यारी : गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांबाबत साशंकता
अमरावती : स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची मर्यादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीलाा लागला असतानाच गॅसचोरीची एकेक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. गॅस घरपोच देणारा कर्मचारी भरलेल्या सिलिंडरमधून बेमालूमपणे गॅस काढून कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याचा प्रकार अनेकदा उघड झाला आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरुन तसेच वाहनात भरुन जादा दराने विक्री करण्याचे प्रकारही शहरात समोर आले आहेत. त्यामुळे कमी वजनाचा गॅस आपल्या माथी मारुन एजंटने फसवणूक केल्याची नागरिकांची भावना झाली आहे. अगोदरच महागाई त्यात अशा प्रकाराने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.
सिलिंडर दरात फसवणूक
गॅस संपला तर लगेच मिळायला हवा. परंतु अनेकदा तो दिला जात नाही. मात्र, दुसरीकडे गॅस सिलिंडर काळाबाजारात राजरोस विकला जातो. यामुळे तुटवडा निर्माण होतो. घरगुती विनाअनुदानित गॅससाठी ४७० रुपये घेतले जातात. घरगुती गॅसचे वजन १४.६ किलो असते. परंतु अनेकदा तो कमी भरतो. काही टोळ्या हा गॅस काढून घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर देताना त्यांचे वजन करुन दिले पाहिजे. पण, किती एजन्सीज हा नियम पाळतात, हा प्रश्न आहे.
एजन्सीवाले गॅसच्या काळाबाजारात
अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाही. घरगुती सिलिंडर व्यावसायिकांना विकून पैसा कमविण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. अशा वेळी एजन्सीवाले काय करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उलट काही एजन्सीवाले गॅसच्या काळाबाजारात सहभागी होऊन नफेखोरी करतात, असे आरोप ग्राहकांकडून केले जात आहेत. पुरवठा विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नाही. त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरूच आहे. सर्वच गॅसच्या एजन्सीज त्यात सहभागी नाहीत. काही चांगल्या पद्धतीने काम करुन ग्राहकांना नियमित व वेळेवर गॅसचा पुरवठा करतात. पण त्यांची संख्या कमी आहे. गॅसचा हा काळाबाजार वाढला असला तरी गॅसचा होणारा अनधिकृत वापर हा तर काळ्याबाजारापेक्षाही धोकेदायक बनू लागला आहे. गॅसचा वाहनांसाठी होणारा व्यापार अत्यंत घातक आहे. अनेकदा या गॅसच्या वापरामुळे वाहनांचा स्फोट होऊन अपघात झाले आहेत.
वेळेवर सिलिंडर मिळत नाही
शहरातील काही एजन्सीचे घरपोच गॅस देणारे एजंट सिलिंडर बुकिंग केल्यानंतरही सुमारे आठ दिवस संबंधित ग्राहकांना सिलिंडर देत नाहीत. असे सिलिंडर बुकिंगनंतर लगेच काळाबाजार करुन अनधिकृत केंद्राला जादा दराने विकले जातात. तर पुढच्या ग्राहकाचे सिलिंडर पहिल्या ग्राहकाला दिले जाऊन पुढचा ग्राहक आठ दिवस वेटिंगवर ठेवला जातो. असा राजरोस काळाबाजार शहरात सुरू आहे. ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नाही. ग्राहकांची ससेहोलपट सतत केली जाते.