'फुलराणी'ची होईल का डोळ्यांदेखत विक्री?
By Admin | Updated: December 22, 2014 22:37 IST2014-12-22T22:37:41+5:302014-12-22T22:37:41+5:30
आईबाबांच्या स्वप्नातील ती 'फुलराणी'च. लाडाकौतुकात वाढलेली. जाळे पसरवून बसलेल्या तरुणाच्या सापळ्यात ती बेमालूमपणे अडकली. वर्धेहून तो अमरावतीत आला. घरातून निघून ती तपोवनच्या बालगृहात गेली.

'फुलराणी'ची होईल का डोळ्यांदेखत विक्री?
मातापित्यांची तक्रार : तपोवनचे बळ, दोन वर्षांपासून शोषण, बाल कल्याण समितीची भूमिका काय ?
गणेश देशमुख - अमरावती
आईबाबांच्या स्वप्नातील ती 'फुलराणी'च. लाडाकौतुकात वाढलेली. जाळे पसरवून बसलेल्या तरुणाच्या सापळ्यात ती बेमालूमपणे अडकली. वर्धेहून तो अमरावतीत आला. घरातून निघून ती तपोवनच्या बालगृहात गेली. 'त्याच्या'च योजनांचा तो भाग होता. त्याची जणू ती मालमत्ताच असावी, असा आता तो तिचा वापर करतोय. बलात्काराच्या आरोपात अटक झालेल्या तपोवनातील कारभाऱ्यांनीच हे सारे घडू दिले.
तो तिला छळतो. मुलगी डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना आईवडील दोन वर्षांपासून केवळ बघताहेत. कायद्याच्या अडचणीमुळे दुसरे ते काही करूही शकत नाहीत. 'दोन वर्षे झालीत तिचे शोषण सुरू आहे. आता मुलीची विक्री तेवढी रोखा हो,' असा हृदय पिळवटणारा त्यांचा आक्रोश प्रत्येक जबाबदार कानांवर आदळतोय. मात्र अधिकारी सारेच बहिरे अन् ठार. मुलीच्या सुरक्षेसाठी वेडेपिसे झालेल्या 'त्या' मातापित्यांना कुणीच नाही का देऊ शकणार या अंबानगरीत न्याय?
अमरावतीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली 'अंबा' (काल्पनिक नाव) नजरेत भरावी अशीच. आईवडिलांना एकटीच. एक लहान भाऊ. तिचे वडील एका खासगी कारखान्यात नोकरीला. (आईवडिलांचे नाव, आडनाव येथे मुद्दामच नमूद केले नाही.) वर्धा तिचे मामेकूळ. ती वर्धेला शिकायला होती. वर्धेत इयत्ता आठवीत असताना ललित अग्निहोत्री नावाच्या तरुणाशी भावनिक जवळीक झाल्याचे लक्षात येताच मामांनी अंबाला आईवडिलांकडे आणून दिले. अंबा अमरावतीत शिकायला लागली. ललितही तिच्या पाठोपाठ अमरावतीत आला. वारंवार तो तिला शाळेबाहेर भेटायचा. एक दिवस अचानक अंबा घरून गेली. १४ वर्षांची ही पोर पहिल्यांदा शासकीय आणि नंतर तपोवनच्या बालगृहात राहू लागली. काळजाच्या या तुकड्याला परत नेण्यासाठी आईवडिलांनी शक्य सारीच शक्ती एकवटली. तथापि, 'चाईल्ड अॅन्ड प्रोटेक्शन' कायद्याचा वापर करून अंबा जन्मादात्यांपासून दूरच ठेवली जात आहे. कमाईची सोय नसलेला; पण अमरावतीत वास्तव्यास असलेला ललित अग्निहोत्री बालगृहाच्या कारभाऱ्यांना हाताशी धरून हे सारे घडवून आणतोय, अशी तक्रार मातापित्याची आहे. तपोनवनमधी अनाथांवरील बलात्कारप्रकरणे उघड होऊ लागल्यावर मुलीच्या विक्रीचा संशय असलेल्या आईवडिलांचा आरोप विशेष महत्त्वपूर्ण ठरतो. (क्रमश:)
डोळ्यांदेखत तिसऱ्याच्या हवाली!
तारुण्यसुलभ भावनांतून अशी फसगत केली जाईल याची पुसटशीही कल्पना अंबाला नव्हती. आईवडिलांकडे येण्यासाठी अर्ज करणाऱ्या अंबावर आता दहशतीने नियंत्रण मिळविले जाऊ लागले आहे. गुरांना मारावे अशा रितीने ललीत अग्निहोत्री हा तरुण अंबाला वसतिगृहाच्या खोलीत जाऊन मारत असल्याचे पुरावे आहेत. 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन'चा धाक दाखवून ज्या कारभाऱ्यांनी जन्मदात्यांना अंबासोबत भेट सातत्याने नाकारली, त्याच कारभाऱ्यांनी ललित नावाच्या तिऱ्हाईत मुलाला अंबाच्या भेटीसाठी वसतिगृह कायम मोकळे करून दिले. आईवडिलांसमोरदेखील हे सतत घडत राहिल्याने कायदा त्या मुलासाठी नाही काय, असा सवाल आईवडिलांनी केला. त्यावेळी कारभाऱ्यांनी दिलेले उत्तर चकित करणारे होते. 'तो आमच्या संस्थेचा डोनर आहे,' अशी त्याची पाठराखण करण्यात आली.
साऱ्यांचीच मिलीभगत!
घरून काढून तपोवनातील बालगृहात ठेवलेल्या अंबाला इच्छेनुसार कधीही, कुठेही नेण्याचे स्वातंत्र्यच ललित अग्निहोत्रीने मिळवून घेतले. अलिकडेच अटक झालेले तपोवन बालगृहाचे अधीक्षक गजानन चुटे तसेच सचिव श्रीराम गोसावी यांच्या डोळ्यांदेखत हे सर्व घडत होते. मातापित्यांनी त्यावर वारंवार हरकत घेतली; परंतु त्यांना दाद देण्यात आली नाही. या बालगृहाचे प्रशासक असलेले उपजिल्हाधिकारी अजय लहाने यांनीदेखील हा प्रकार रोखला नाही. मातापित्यांचा आक्रोश हवेत विरत राहिला.