पेरणी नकोच ! १५ जुलैपर्यंत पाऊस बेभरवशाचा
By Admin | Updated: July 7, 2015 00:02 IST2015-07-07T00:02:43+5:302015-07-07T00:02:43+5:30
जिल्ह्यात १२ जूनला आगमन झालेल्या मान्सूनने २४ जूननंतर दडी मारली आहे.

पेरणी नकोच ! १५ जुलैपर्यंत पाऊस बेभरवशाचा
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यात १२ जूनला आगमन झालेल्या मान्सूनने २४ जूननंतर दडी मारली आहे. तब्बल १३ दिवसांपासून पावसात खंड पडला आहे. १० तारखेपर्यंत काही ठिकाणी तुरळक सरींचा अंदाज असला तरी १५ जुलैपर्यंत दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले. जमिनीत ओलावा नाही अशा स्थितीत पेरणी केल्यास मोड येणार आहे. यापूर्वी १३ दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे किमान ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीची भीती निर्माण झाली आहे.
दोन आठवड्यांपासून पाऊस बाधित झाल्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. शुक्रवारपर्यंत जिल्ह्याच्या ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ९७ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. ही टक्केवारी ५५.५६ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात १७ ते २२ जून दरम्यान दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. २३ ते २४ जून काही तालुक्यात तुरळक पाऊस पडला. त्यानंतर पावसाने दडी मारली. तब्बल १४ दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरणी होऊन उगवलेली रोपे माना टाकत आहेत. जमिनीवर मातीचे कडक आवरण तयार झाल्याने जमिनीत पेरलल्या बियाण्यांचे अंकुर आर्द्रतेअभावी जमिनीतच मरू लागले आहेत. कोरडवाहू पिकांची अवस्था तर अधिकच भयंकर आहे. अशीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यातील ६० टक्क्यांमधील पेरणीला मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे.
विदर्भासह महाराष्ट्रातच मान्सून सक्रिय झाल्याची स्थिती नाही. प्रशांत महासागरात निर्माण झालेली चक्रीवादळे मान्सूनच्या वाटेत बाधा निर्माण करीत आहेत.
पीक व्यवस्थापन गरजेचे : प्रशांत महासागरातील चक्रीवादळाने मान्सून बाधित
या कारणांनी झाला भारतातील मान्सून बाधित
प्रशांत महासागरात निर्माण होणारी वादळे मान्सूनला बाधित करतात. सध्या तेथे ‘टेन’ नावाचे वादळ आणि ‘चान होम’ नावाचे चक्रीवादळ सक्रिय असल्याने भारतीय मान्सून बाधित झाला आहे.
कमी तीव्रतेचे ‘टेन’ हे ‘लिंफा’ या चक्रीवादळात परावर्तीत झाले आहे. यामुळे फिलीपाईन देशात महापुराचे संकट आहे.
‘चान होम’ हे दुसरे चक्रीवादळ ‘लिंफा’च्या पाठोपाठ येत आहे. हे वादळ शांघाय ते कोरीया या भागात उत्पात घडविणार आहे. याचा वेग ताशी ८५ ते १०० कि.मी. आहे. हे वादळ १० जुलैच्या आसपास चीनच्या भूमीवर धडकणार आहे.
चान होमच्याच पाठोपाठ ‘नांगका’ हे वादळ सुध्दा सक्रिय आहे.
ही तिनही वादळे भारतीय उपखंडातील वाऱ्याची दिशा व लयबध्दतेमध्ये विस्कळीतपणा निर्माण करीत आहेत. यामुळे मान्सूनचा शक्तीपात होत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.
७ ते १० जुलैदरम्यान काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भात १५ जुलैपर्यंत पावसाची शक्यता कमी आहे.
- अनिल बंड, हवामान तज्ज्ञ.
जमिनीत ओलावा नाही. त्यामुळे पाऊस येईपर्यंत खरिपाची पेरणी करु नये. सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी जमीन खोलवर भिजल्याशिवाय पेरणी करु नये..
- दत्तात्रय मुडे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.