युवा क्रांती दलाचे जिल्हा कचेरीवर धरणे
By Admin | Updated: April 10, 2015 00:30 IST2015-04-10T00:30:53+5:302015-04-10T00:30:53+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये, या मागणीसाठी गुरूवारी आदिवासी युवा क्रांती दलाने जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले.

युवा क्रांती दलाचे जिल्हा कचेरीवर धरणे
अमरावती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये, या मागणीसाठी गुरूवारी आदिवासी युवा क्रांती दलाने जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले. यावेळी कर्त्यानी मागणीचे निवेदन जिल्हाजिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सोपविले.
सद्यस्थितीत राज्यात आदिवासींच्या अनुसूचित जमाती (एस टी) आरक्षण धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्यासाठी प्रथम धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत घटनेच्या अनुच्छेद ३४२ (२) प्रमाणे समाविष्ट करावे लागेल त्या शिवाय आदिवासीना असलेले आरक्षण त्यांना मिळणार नाही. तसेच एखाद्या जातीचा एसटी प्रवर्गात समावेश करणे अथवा दुरूस्ती यासंबंधी केंद्र शासनाने जून १९६६ ला कार्यपध्दती विहित केली आहे. त्यानंतर २००२ मध्ये त्यात दुरूस्ती केली आहे. या कार्यपद्धती प्रमाणे जे दावे राज्य सरकार, रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय अनूसुचित जमाती आयोग या तिघांनी शिफारस केली असता असे दावेच मसुदा समितीत मांडले जातात. संसदेने विधेयक पारीत केल्याशिवाय अनूसुचित जमातीच्या यादीत वगळणे व दुरूस्ती होऊ शकत नाही, असे आदिवासी युवा क्रांती दलाने या निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकार अथवा रजिस्ट्रार जनरल यांनी केलेले दावे अनुसूचित जमाती आयोग फेटाळू शकतात. शिफारसी जर निकषांना धरून नसेल तर धनगर आणि इतर जाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केलेले निकष पूर्ण करीत नाही. म्हणून संसदेने २००२ साली विधेयक फेटाळले होते. तसेच संसदेने धनगड व धनगर वेगळे असल्याचे मान्य करून अनुसूचित जमातीच्या यादीत २००२ मध्ये दुरूस्ती करण्याला संमती दिलेली नाही.
या सर्व प्रार्श्र्वभूमीवर अनुसूचित जमातीमध्ये नवीन जातीचा समावेश करू नये अशी मागणी आदिवासी युवा क्रांती दलाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. आंदोलनात राजू मसराम, रामेश्र्वर युवनाते, शालीकराम मानक र, प्राची आत्राम, संजय मसराम, सुखदेव सोळंके, शोभा उईके, सीमा मरकाम, विवेक युवनाते, रामेश्र्वर उईके आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)