जिल्हा परिषदेत कोरड्या दुष्काळाचा ठराव पारित
By Admin | Updated: July 18, 2015 00:22 IST2015-07-18T00:22:18+5:302015-07-18T00:22:18+5:30
जिल्ह्यात सध्या पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

जिल्हा परिषदेत कोरड्या दुष्काळाचा ठराव पारित
सर्वसाधारण सभा : विविध मुद्यांवर सभागृहात वादळी चर्चा
अमरावती : जिल्ह्यात सध्या पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणयाच्या दृष्टीने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा सदस्य सुरेखा ठाकरे यांनी सभागृहात मांडला हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कशीतरी पेरणी केली. मात्र तब्बल २४ दिवसांपासून पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जिल्हा परिषदेची सुमारे २५० कोटी रूपये ठेवी असलेल्या जिल्हा बँकेतील सुमारे शंभर कोटी रूपये मुदती ठेवी करून त्यावर मिळणाऱ्या व्याजातील रक्कमेतून शेतकऱ्यांना मदत करता येईल का, याचा विचार सभागृहाने करावा, अशी मागणी सुरेखा ठाकरे यांनी केली आहे. यावर माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्याचे पिठासीन सभापती सतीश उईके यांनी सांगीतले. दरम्यान याच मुद्यावर सदस्य रवींद्र मुंदे यांनीही शेतकऱ्यांना दुबारा पेरणीसाठी राज्य शासनाने बी-बियाणे व आर्थिक मदतही करावी, अशी मागणी केली. या मुद्याला सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सहमती दर्शविली. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. सर्वसाधारण सभा १७ जुलै रोजी विविध विषयाला अनुसरून डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. या सभेत कृषी विभागामार्फत सन २०१५-१६ मध्ये जिल्हा निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे पुनर्नियोजन प्रस्ताव व योजना राबविण्यासाठी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. जि.प. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीची निविदा प्रक्रिया न राबविता कुठल्या आधारावर खरेदी करण्यात आली आदी प्रश्न ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना विचारले. यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याची चौकशी करण्याची सूचना अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावर्षी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फ त सुमारे ३० लाख रूपयांच्या पी.व्ही.सी पाईप खरेदीस सभागृहाने मंजुरी दिली आहे. यावेळी अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, अभिजित ढेपे, प्रताप अभ्यकर, महेद्र गैलवार, प्रमोद वाकोडे, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंगवी, ममता भांबुरकर, ज्योती आरेकर, पं स. सभापती विनोद टेकाडे, आशिष धर्माळे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, खातेप्रमुख बीडीओ आदी उपस्थित होते.