जिल्हा बंद उत्स्फूर्त, सर्व सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:31 IST2020-12-11T04:31:34+5:302020-12-11T04:31:34+5:30
राजकीय पक्ष, संघटनांचा सहभाग अमरावती : शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ व केंद्र शासनाचे शेतकरीविरोधी कायदा हाणून पाडण्यासाठी विविध राजकीय पक्ष ...

जिल्हा बंद उत्स्फूर्त, सर्व सेवा विस्कळीत
राजकीय पक्ष, संघटनांचा सहभाग
अमरावती : शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ व केंद्र शासनाचे शेतकरीविरोधी कायदा हाणून पाडण्यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला शहरात संमिश्र व ग्रामीणमध्ये उस्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक वगळता सर्व सेवा दुपारपर्यंत ठप्प होत्या.
महाविकास आघाडीने सकाळी १० वाजता येथील राजकमल चौकात शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाचा निषेध करीत रॅली काढली, राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गाने रॅली काढण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून समारोप करण्यात आला. या रॅलीचे आयोजन महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी केले होते. यामध्ये आमदार सुलभा खोडके, माजी खासदार अनंत गुढे, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, शिवसेनेचे महानगर प्रमुख पराग गुडधे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, नाना नागमोते, गटनेता भारत चौधरी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष नंदकिशोर शेरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने ही बंदची हाक देण्यात आली होती. मंगळवारी सकाळी १० वाजत इर्विन चौकातून डाव्या आघाडीचे घटकपक्ष व काही सामाजिक संघटनांद्वारे निषेध रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडी, आप, भाकप, माकप आदींचा यामध्ये सहभाग होता. इतवारा बाजार मार्गाने निघालेली या रॅलीद्वारे चौकाचौकांत शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राजकमल चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यामध्ये तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, अलीम पटेल, सुभाष पांडे, सिद्धार्थ गायकवाड, जे.एम. कोठारी, चंद्रकांत बानुबाकोडे यांच्यासह विविध पक्षांचे पदधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बॉक्स
मुख्य बाजारपेठ बंद
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व बंदला सहकार्य करण्यासाठी शहराच्या प्रमुख मार्गावरील सर्व मार्केट बंद होते. मात्र, अंतर्गत भागातील काही दुकाने उघडी होती. सकाळी १२ पर्यंत ऑटोरिक्षा सेवा विस्कळीत झालेली होती. काही व्यापारीदेखील बंदच्या रॅलीत सहभागी झाले होते.
बॉक्स
बस सेवा विस्कळीत, महामार्गही ठप्प
बंददरम्यान महामंडळाची एकही बसही आगारातून सुटली नाही. काही संघटनांनी आंदोलनास सहकार्य करण्याचा ठराव केला होता. याव्यतिरिक्त अन्य आगारांतील बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली, खासगी ट्रॅव्हल्सदेखील सकाळपासून बंद होत्या. महामागार्वरील वाहतूकही विस्कळीत झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात अनुचित प्रकाराची नोंद झाली नाही.