११५ बचत गटांना तीन कोटी रुपयांचे कर्ज वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST2021-07-24T04:10:37+5:302021-07-24T04:10:37+5:30
पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-कार्ट रिक्षा, कृषी अवजारे वाटप, महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल अमरावती : नवतेजस्विनी योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण व ...

११५ बचत गटांना तीन कोटी रुपयांचे कर्ज वितरित
पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-कार्ट रिक्षा, कृषी अवजारे वाटप, महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल
अमरावती : नवतेजस्विनी योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण व अत्याधुनिक व्यवसायांचे प्रशिक्षण महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ११५ गटांना ३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. त्यामुळे महिलांमध्ये असलेली उद्योगप्रियता लक्षात येते. सर्व स्तरातील महिलांचा त्यांच्या बचत गटात सक्रिय सहभाग असावा. अल्पसंख्यांक महिलांनीदेखील बचतगट तयार करून विकास साधावा, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने श्री.शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवन येथे माविमच्या रोजगार निर्मिती योजनेंतर्गत आयोजित विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. ना. ठाकूर यांच्या हस्ते महिला स्वयंसहायता बचत गटांना भाजीपाला विक्री ई-कार्ट रिक्षा आणि महिला बचत गटांना कर्ज वितरित करण्यात आले. तसेच माविमने कोरोनाकाळात महिलांना स्वयंरोजगार प्रदान केला, त्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला माविमच्या मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे, मानव विकास मिशनचे औरंगाबादचे माजी उपायुक्त रुपचंद राठोड, माविमचे निवृत्त जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल राठोड, माविमच्या जिल्हा सनियंत्रण अधिकारी मीनाक्षी शेंडे आदी उपस्थित होते.
-------------------
पालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटांना धनादेशचे वाटप
पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते जिल्हयातील ११५ गटांना २ कोटी ९१ लक्ष रुपये कर्ज वितरीत करण्यात आले. तर वैयक्तिकरित्या तीन बचत गटांना म्हणजेच लोणी येथील आम्रपाली स्वयंसहायता बचत गटाला ७ लक्ष ५० हजार रुपये, अचलपूर येथील आशिर्वाद तर दर्यापूर येथील दुर्गा स्वयंसहायता बचत गटाला प्रत्येकी ७ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. हाथीपुरा येथील अल्पसंख्यांक महिलांचा मोहम्मद झियान यांच्या गटाला व करीमपुरा येथील सरोज बचत गटाला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
----------------------
पालकमंत्र्यांनी केला आशासेविकांचा सन्मान
कोरोनाकाळात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या आशा सेविकांना पालकमंत्री ठाकूर यांनी मास्क वाटप करुन सन्मानित केले. सुनीता खराटे, वैशाली गेडाम, रेखा पवार व पूजा ढोके यांना सन्मानित केले. कार्यक्रमाचे संचालन अचलपूरच्या सोनाली पुंडकर यांनी तर आभार माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी ऋषिकेश घयार यांनी केले.