दोन लाख एकरांतील सोयाबीन पीक बाधित

By Admin | Updated: August 6, 2016 00:02 IST2016-08-06T00:02:21+5:302016-08-06T00:02:21+5:30

गेल्या महिनाभर सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस, जमिनीत अधिकचा ओलावा,...

Disrupted soybean crop of two lakh acres | दोन लाख एकरांतील सोयाबीन पीक बाधित

दोन लाख एकरांतील सोयाबीन पीक बाधित

नवे संकट : अतिपाऊस, ढगाळ वातावरण, अपुऱ्या सूर्यप्रकाशाचा परिणाम
गजानन मोहोड अमरावती
गेल्या महिनाभर सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस, जमिनीत अधिकचा ओलावा, सतत ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, या सर्व घटकाचा प्रतिकूल परिणाम होऊन जिल्ह्यात किमान दोन लाख एकरमधील सोयाबीन पिवळे पडत आहे. तसेच रोग किडीचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकासाठी तीन लाख २३ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ४ आॅगस्टपर्यंत २ लाख ८७ हजार ७१४ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे पीक पिवळे पडत आहे. या पिकावर केसाळ अळी, उंट अळी, तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २ लाख एकरांवरील पिके बाधित झालेली आहेत. यासाठी वेळीच उपाययोजना न केल्यास सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी येण्याची शक्यता आहे.
सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे
सद्यस्थितीत जमिनीत अधिक ओलावा असल्यामुळे जमीन संपृक्त झाली आहे. अशा स्थितीत हवा खेळती न राहल्याने मुळांना श्वासोस्वास घेण्यास अडथळा येतो. यामुळे जमिनीतील पोषण द्रव्य शोषून घेता येत नाही. परिणामी रोपे, झाड व्यवस्थित आपली जीवनकार्ये करू न शकल्यामुळे शेंडाकडील पाने पिवळी पडत आहे. सततच्या पावसामुळे शेतीत ओलावा कायम असल्यामुळे डवरणी करण्यास अडचण निर्माण झाली. ज्या जमिनीचा सामू अधिक आम्लधर्मीय असतो अशा शेतातील पाने जमिनीत अधिक ओलावा असल्यामुळेसुद्धा पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येते. जमिनीतील पोषण द्रव्य जसे की नत्र, लोह व पालाशची कमतरता भासल्याससुद्धा पाने पिवळी पडतात. मात्र पानाच्या शिरा ह्या हिरव्याच दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पाने कशाप्रकारे पिवळी पडत आहे, याचे निरीक्षण करणे गरजेचे आहे.
सतत ढगाळ वातावरण राहिल्यास अपुऱ्या सूर्य प्रकाशामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावल्यानेसुद्धा पाने पिवळी पडतात. यामध्ये शिरा सुद्धा पिवळ्या होतात. अत्याधिक ओलावा असल्याने नत्राच्या गाठी तयार होत नाहीत. त्यामुळे नत्राची कमतरता भासते यामुळेसुद्धा पाने पिवळी पडतात. पिवळा मोझॅक या रोगामुळेसुद्धा पाने पिवळी पडतात. मात्र पानावर हिरव्या-पिवळ्या चट्ट्यांचे मिश्रण आढळते. मुळकूज रोगाच्या प्रादुभार्वानेदेखील पाने पिवळी पडतात. मात्र यामध्ये पाने झाडाच्या खालच्या दिशेने झुकतात. असे झाड उपटल्यास सहज हातात येते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत सोयाबीनची २,८९,५३९ हेक्टर मध्ये पेरणी झालेली आहे. यामध्ये चांदूररेल्वे तालुक्यात २७,३३५ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. तिवसा २२,९१४, मोर्शी १९,०७७, वरुड २,०८०, दर्यापूर ८,५३९, अंजनगाव सुर्जी १५,४२०, अचलपूर १४,०३०, चांदूरबाजार १६,२००, धामणगाव १८,०२३, धारणी ९,९३०, चिखलदरा ११,५४३, अमरावती ३७,०६२, भातकुली २८,६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५०,२७८ हेक्टर क्षेत्र आहे.

अशी करावी मोझैकसाठी उपाययोजना
पिवळा मोझैक या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. परंतु ७५ दिवसानंतर संक्रमण झाल्यास फारसे नुकसान संभवत नाही. रोगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावी. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरिता शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत. त्यासोबतच निंबोळी अर्काची (५ टक्के) १० दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. सद्यस्थितीत जमिनीत अधिक ओलावा असल्यामुळे तसेच सतत ढगाळ वातावरण राहल्यामुळे अपुऱ्या सूर्य प्रकाश्यामुळे पाने पिवळी पडत आहे. त्यामूळे वातावरणात बदल झाल्यनंतर यामध्ये बदल जाणवतील व परिस्थिती निवळण्यास मदत होईल, असे अमरावतीच्या प्रादेशिक संशोधन केंद्राने सांगितले.

अशी करा उपाययोजना
शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढावे. पीक ३० ते ३५ दिवसांचे असल्यास वाफसा आल्यानंतर डवरणी करावी. मात्र पीक फुलोरा अवस्थेत असल्यास डवरणी करू नये. नत्राची कमतरता असल्यास युरियाची ०२ टक्के (२ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून) फवारणी. चुनखडी शेतामध्ये (सामू ८.० पेक्षा जास्त) सोयाबीनचे पिकास फेरस सल्फेट ५० ग्रम + २५ ग्रम कळीचा चुना, १० लिटर पाण्यात मिसळून या मिश्रणाची फवारणी दोन वेळा (पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये) करावी. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही. (पाने पिवळी पडणे) व योग्य वाढ होईल.

जमिनीत अधिक ओलावा, सतत ढगाळ वातावरण वअपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. वातावरणात बदल झाल्यानंतर यामध्ये बदल जानवेल परिस्थिती निवळणार आहे.
- संजय साखरे,
प्रादेशिक संशोधन केंद्रप्रमुख

शेतजमीन संपृक्त झाल्यामुळे जमिनीतील पोषण द्रव्य झाडांना शोषून घेता येत नाही. परिणामी रोपे, झाड व्यवस्थित आपली जीवन कार्य करू न शकल्यामुळे पाने पिवळी पडली आहेत.
योगेश इंगळे, वनस्पती रोगतज्ज्ञ
प्रादेशिक संशोधन केंद्र

तंबाखूची पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव पीक फुलावर येण्यापूर्वी ३-४ लहान अळ्या प्रतीमीटर ओळीत आढळल्यास इंडोक्साकार्ब १५.८ एसी ६.६ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- श्याम मुंजे, कीटकशास्त्रज्ञ,
प्रादेशिक संशोधन केंद्र

Web Title: Disrupted soybean crop of two lakh acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.