तूर खरेदीत शेतकऱ्यांसोबत भेदभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 00:17 IST2017-03-01T00:17:33+5:302017-03-01T00:17:33+5:30
बाजार समितीच्या यार्डमध्ये नाफेडने शासकीय तूर खरेदी सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांनी तूर आणून टोकण क्रमांक घेतले.

तूर खरेदीत शेतकऱ्यांसोबत भेदभाव
शेतकरी त्रस्त : हजारो क्विंटल तूर उघड्यावर !
वरूड : बाजार समितीच्या यार्डमध्ये नाफेडने शासकीय तूर खरेदी सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांनी तूर आणून टोकण क्रमांक घेतले. मात्र अनेक दिवस मोजमाप होत ननसून व्यापाऱ्यांची तूर वेळीच मोजली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून केला जात आहे. शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागते. याकडे नाफेडसह खविसं आणि बाजार समितीचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते. नाफेडच्या तूर खरेदीत सावळागोंधळ सुरू असल्याने शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
शासकीय आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत नाफेडच्यावतीने स्थानिक बाजार समितीमध्ये तूर खरेदी सुरू आहे. हमीभाव ५०५० रुपये प्रतिकिक्वंटल दिला जात आहे, तर खासगी खरेदीमध्ये ४ हजार १०० रुपये भाव मिळत असल्याने शतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता बाजार समितीच्या यार्डमध्ये आणली. १५ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला सुरुवात झाली यामध्ये टोकन क्रमांकानुसार तूर ठेवण्यात आली. असे असले तरी मात्र व्यापाऱ्यांना प्राधान्य देत शेतकऱ्यांची तूर मोजली जात नसल्याची ओरड आहे. एकाच टोकन क्रमांकावर तुरीच मोजमाप करून व्यापाऱ्यांना प्राधान्य दिला जात असल्याने शेतकऱ्यांना १५ -१५ दिवस ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. एका दिवसाला ५ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप केला जात असल्याचे सांगण्यात येते. व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातून ४ हजार १०० रुपये ते ४ हजार २०० रुपयाचे भावात तूर खरेदी करुन व्यापारीसुद्धा शासकीय तूर खरेदीमध्ये तूर विकलायला लागले. आहे. शासकीय हमीभाव आणि खासगी दरामध्ये ८०० ते ९०० रुपयांची तफावत येत असल्याने मोजमापाकरितासुद्धा संबंधिताना चढावा देऊन आधी मोजमाप करण्याचा प्रताप सुरू असल्याची चर्चा आहे. शासकीय तूर खरेदी योजनेत शासनाने ठरवून दिलेल्या एफएक्यू दर्जाच्या निकषानुसार खरेदी केला जाते. आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्केपेक्षा जास्त असू नये, माल चाळणी करून खरेदी करण्यात येतो. माल खरेदी करतेवेळी सातबाराचा मूळ उतारा आणि सन २०१६-१७ चा पेरेपत्रकाची नोंद असणे आवश्यक आहे. तसेच सोबत ओळखपत्र आणणे शेतकऱ्यांना बधंनकारक आहे. ज्या जिल्ह्यातील शेतमाल आहे त्याच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी शेतमाल विक्रीला आणणे अनिवार्य आहे. अशा सूचना असतांनासुद्धा व्यापाऱ्यांच्या तुरीचे मोजमाप वशिलेबाजीतून केला जात असल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये असल्याने २७ फेब्रुवारीपर्यंत एक हजार ५०० शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या होत्या, तर हजारो टन तुरी बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून असल्याने अवकाळी पाऊस आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांवर राहील, असे बंधपत्रसुद्धा भरून घेण्यात आले आहे. तूर खरेदीमध्ये नाफेड, बाजार समिती आणि खरेदी विक्री संस्था या तीन एजेन्सीच्या माध्यमातून तूर खेरदी होत असल्याने एकमेकाकडे बोटे दाखवून खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना मात्र तूर विक्रीकरिता अनेक दिवस ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे असंतोष पसरला आहे. नाफेडचे अधिकारी म्हणतात, आमचे केवळ शेतमाल तपासणीचे आणि मोजमापाचे काम आहे. कुणाचा टोकण क्रमांक आहे, ते आम्हाला माहिती नाही, हे काम बाजार समिती आणि खरेदी विक्री संस्थेचे असल्याचे संबंधित क्वालिटी नियंत्रक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
चढावा देऊन तुरीचे मोजमाप !
बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणलेल्या तुरीच्या मोजमापाकरिता ताटकळत बसावे लागते, तर व्यापाऱ्यांच्या तुरी लवकर मोजमाप होत आहे. याकरिता व्यापाऱ्यांकडून संबंधिताना चढावा दिला जात असल्याची खमंग चर्चा शेतकऱ्यामध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे.