सार्वजनिक नळांच्या तोट्या गायब
By Admin | Updated: October 20, 2015 00:18 IST2015-10-20T00:18:12+5:302015-10-20T00:18:12+5:30
जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन, त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी जुळ्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेल्या नळांना...

सार्वजनिक नळांच्या तोट्या गायब
अवैध कनेक्शन : अचलपूर शहरात पाण्याचा अपव्यय, नागरिकांकडूनही गैरवापर
लोकमत विशेष
अचलपूर : जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन, त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी जुळ्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेल्या नळांना तोट्या बसवून पाण्याच्या बचतीविषयी पालिकेने जनजागृती मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यात काही गावांत पाणी टंचाई आहे. जेथे सुविधा आहे तेथे काही सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत. काही ठिकाणी तोट्या आहेत पण पाणी भरून झाल्यावर नळाची तोटी बंद करण्याची तसदी नागरिक घेत नाहीत. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. शहरातील काही भागांतील जलवाहिन्या लिकेज झालेल्या आहेत. कुठे व्हॉलमधून पाणी वाया जात आहे, तर कुठे पाणीच नाही. (प्रतिनिधी)
बालकांनी घेतला होता पुढाकार
जुळ्या शहरात बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नासल्याने पाणी वाया जाते. असाच प्रकार दोन वर्षांपूर्वीपर्यंत अचलपूर-परतवाडा मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ होता. तेथे दोन सार्वजनिक नळ आहेत. सकाळी संध्याकाळी नळाला पाणी आल्यानंतर एका तासात आजूबाजूचे रहिवासी पाणी भरत असत. नळांना तोटी नसल्याने नागरिकांचे पाणी भरून झाल्यावरही पाच ते सहा तास नळांमधून पाणी वाया जात होते. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने यश रावत, अभिषेक सरकटे, अंकुर टेकाडे, जीवन शर्मा, अनिकेत पाटील, अजिंक्य चौधरी, निखिल दौलतानी, सौरभ धांडे आदी शाळकरी विद्यार्थ्यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर नगरपालिकेने तेथील नळांना तोट्या लावल्या होत्या.
डोळे उघडले नाही
या एका ठिकाणच्या सार्वजनिक नळांना तोट्या लावावेत म्हणून विद्यार्थ्यांनी नगरपालिकेला दोन वर्षांपूर्वी निवेदन दिले होते. पण शहरातील बहुतांश सार्वजनिक नळ विनातोटीचेच होते. शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या लेखी निवेदनावरून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे डोळे उघडायला हवे होते, पण तसे झाले नाही.
गोरगरिबांसाठी सार्वजनिक नळाची सोय आहे. बहुतांश भागातील नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. या नळांवर नेहमी कपडे धुणे, गाड्या धुणे, गुरे-ढोरे धुणे, असा उपयोग केला जातो. म्हणजे उपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त होत आहे. आतापासून पाण्याचे नियोजन केल्यासच उन्हाळ्याला पाणीटंचाई भासणार नाही. काही ठिकाणी नळांना टिल्लू पंप लावून पाणी घेतले जाते.
- गजानन कोल्हे, माजी नगरसेवक.
बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी वाया जाते. नगरपालिकेने शहरातील प्रत्येक घरात नळकनेक्शन मोहीम नाममात्र दखल घेऊन सार्वजनिक नळ बंद केल्यास पाणी वाया जाण्याचा प्रश्नच राहणार नाही. अवैध नळ अजूनही शहरात सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते सुरू आहेत. बांधकाम करणारे पाणी कोठून घेतात, हे सांगण्याची गरज नाही.
- विलास थोरात, सामाजिक कार्यकर्ते.
पाणीपुरवठा विभागाकडून अवैध नळ कनेक्शन मिळवून देणारे काही दलाल असल्याची माहिती आहे. पॅराडाइज कॉलनीत एका अवैध भूखंडावर बांधकाम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अवैध नळ कनेक्शन एका रात्रीतून देण्यात आले होते. मी त्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केल्यावर ते कनेक्शन तोडण्यात आले. पण त्या अवैध नळधारकावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली नव्हती.
-मो. अजहर मो. जफर,
जिल्हा उपाध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी.