अमरावती : राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्या संकल्पनेनुसार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी गावात मुक्कामाला जाण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, सहारिया मुख्य सचिव पदावरुन सेवानिवृत्त होऊन राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले. अशातच आघाडी सरकारचा कार्यकाळ संपला. राज्यात नवे भाजपा सरकार सत्तेत येताच ग्रामस्थांना थेट भेटण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.जे.एम. सहारिया यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांच्या समस्या जणून घ्यावा यासाठी हा उपक्रम सुरु केला. दरम्यान वीज, पोलीस आरोग्य या विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गावात राहून आपल्या विभागाशी संबंधित समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. राज्यभर सुरु झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत बहुतांश जिल्हाधिकारी गावात राहून आलेत. तेथील प्रश्न जाणून ते मार्गी लावण्यातही यश मिळविले. अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्च महिन्यापर्यंत गावागावांत मुक्काम करुन आले. मात्र अशातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्यामुळे पुन्हा दुसरी दोन नवी गावे निवडतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र तसेच कामाच्या व्यापात काही घडलेच नाही. परिणामी हा लोकाभिमुख उपक्रम सध्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे.यापूर्वी मुख्य सचिवांच्या आदेशामुळे वरिष्ठ अधिकारी गावात येत असल्याने गावातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होत होती. दरम्यान बहुतांश गावांत महसूल विभाग, आरोग्य, पोलीस पाटबंधारे यांचेही प्रश्न आहेत. सध्या वीज भारनियमन सुरु आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक बसतो आहे. विजेअभावी ग्रामस्थांना कशा कठीण परिस्थितीतून जावे लागते हे सांगुूा कळणार नाही. त्यापेक्षा त्याचा अनुभव घेतल्यावरच गांभीर्य लक्षात येते. याशिवाय दुर्गम भागासोबतच रस्त्यावरील गावांतील काही गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांमुळे नागरिकांत निर्माण होणारे भय काय असते हेही कळून येते. यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनीही एक दिवस गावात थांबून हा प्रकार अनुभवला, याचा गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. ग्रामीण भागात आरोग्याचे प्रश्न आहेत. बहुतांश ठिकाणी दवाखाने असले तरी तेथे डॉक्टर थांबत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांचे कसे हाल होतात याचा अनुभव घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यावर उपाय करता येईल. दर महिन्याला दोन गावांचे प्रश्न सुटले तरी मोठी मदत होईल. मात्र तत्कालीन मुख्य सचिव सहारिया यांनी सुरु केलेला हा उपक्रम सचिव व सरकार बदलताच बंद पडला की काय यावरुन सध्या उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
ग्रामस्थांना थेट भेट, प्रक्रियेला अधिकाऱ्यांचा ‘खो’
By admin | Updated: December 8, 2014 22:28 IST