बँकेतून अनुदान निधी काढण्यास अडचणी
By Admin | Updated: May 10, 2014 23:58 IST2014-05-10T23:58:52+5:302014-05-10T23:58:52+5:30
गारपीटग्रस्तांची यादी तयार करीत असताना त्रुटी राहिल्यामुळे बँकेमधून रक्कम काढण्यासाठी शेतकर्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे.

बँकेतून अनुदान निधी काढण्यास अडचणी
अमरावती : गारपीटग्रस्तांची यादी तयार करीत असताना त्रुटी राहिल्यामुळे बँकेमधून रक्कम काढण्यासाठी शेतकर्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात पाऊस व गारपीट यामुळे जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रचलित मदतीच्या निकषापेक्षा अधिक मदतीचे पॅकेज शासनाने दिले. महसूल व कृषी विभागाचे संयुक्त सर्वेक्षण होऊन ५० टक्क्यांवर अधिक शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांची यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये काही शेतकर्यांची नावे चुकली तर काही शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचा लिहिण्यात आला. त्यामुळे शेतकर्यांना बँकेतून मदतनिधीची रक्कम काढताना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकर्यांना समजावून सांगताना बँक कर्मचार्यांच्या नाकीनऊ आले आहे. खरीप हंगाम महिन्याभरावर आला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, खते यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. अशा वेळी अनुदान निधीमुळे शेतकर्यांची आर्थिक अडचण काही प्रमाणात दूर होऊ शकते. परंतु महसूल कर्मचार्यांनी तयार केलेल्या सदोष याद्यामुळे अनेक शेतकर्यांना रक्कम मिळू शकली नाही. यादीमधील त्रूटी दूर करण्यासाठी शेतकर्यांना पुन्हा तहसील कार्यालयात जावे लागत आहे व त्रुटी दुरूस्तीचे पत्र पुन्हा बँकेत न्यावे लागत आहे. त्यानंतर त्यांना अनुदान निधी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. शेतकरी मदतीपासून वंचित राहत असल्याविषयी अनेक तक्रारी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आल्या आहेत. हा त्रास कमी व्हावा, अशी शेतकर्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)