अंजनगावात तहसीलदारांनी ११०० बांगलादेशी, रोहिंग्यांना जन्मदाखले दिले का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:21 IST2025-01-10T11:20:00+5:302025-01-10T11:21:24+5:30

Amravati : एसडीएमसह चार सदस्यीय समिती, पोलिसांकडून स्वतंत्र तपास

Did the Tehsildar issue birth certificates to 1,100 Bangladeshis and Rohingyas in Anjangaon? | अंजनगावात तहसीलदारांनी ११०० बांगलादेशी, रोहिंग्यांना जन्मदाखले दिले का ?

Did the Tehsildar issue birth certificates to 1,100 Bangladeshis and Rohingyas in Anjangaon?

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदारांनी सुमारे ११०० बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लिमांना खोट्या पुराव्यावरून जन्मदाखले दिल्याची तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्या तक्रारीतील मुद्द्यांची शहानिशा करण्यासाठी दर्यापूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच याबाबत पोलिसही स्वतंत्ररीत्या तपास करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी गुरुवारी 'लोकमत'ला दिली.


या समितीत अंजनगाव सुर्जीचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, अंजनगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व तेथीलच गटविकास अधिकारी श्रीकिसन खताळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. ही चार सदस्यीय समिती मागील सहा महिन्यांत अंजनगाव सुर्जी तहसील प्रशासनाने दिलेल्या जन्मदाखल्यांची, त्यासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची तपासणी करेल, त्यासाठी त्यांना सात दिवसांचा कालावधी दिल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली. साधारणतः दीड वर्षापूर्वी वर्षभरापूर्वी जन्मलेल्यांचे जन्मदाखले वितरणाची जबाबदारी तहसीलकडे आली. अंजनगाव सुर्जी तहसीलनेदेखील विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करत जन्मदाखले दिले आहेत. त्यामुळे चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


डीआयओंना १२ची सूचना, पत्रक साडेतीन तासांनी 
जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी तातडीने मीटिंग घेतली. तथा दुपारी १२ वाजताच त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक माध्यमांना देण्याचे निर्देश जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, सोमय्यांच्या तक्रारीवर जिल्हा प्रशासनाची भूमिका समजावून घेण्यासाठी दुपारी ३:१५च्यादरम्यान माध्यम प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावर आपण डीआयओना तर १२ लाच सांगितले होते, त्यांनी माहिती दिली नाही काय, अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना केली. त्यानंतर, दुपारी ३:४३ वाजता डीआयओंकडून त्यासंदर्भात वृत्त अपलोड करण्यात आले.


सोमय्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, पुरावे दिले नाहीत 
अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या सहा महिन्यांत एक हजाराहून अधिक बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लीम यांना खोटे पुरावे दाखले, कागदपत्राच्या आधारावर जन्माचा दाखला अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांनी दिले आहेत, असे सोमय्या यांच्या तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे मालेगावसाठी नियुक्त केलेल्या एसआयटीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून त्यात अंजनगावसुर्जी तालुक्याच्याही समावेशाची विनंती त्यांनी केली आहे. त्याबाबत गुरुवारी किरीट सोमय्या यांच्यासोबत फोन कॉलवरून बोलणे झाले. त्यांना त्याबाबत पुरावे मागितले. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून कुठलेही पुरावे देण्यात आले नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


"खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी, दर्यापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. सोमय्या यांच्या तक्रारीत देण्यात आलेले जन्माचे दाखले आणि त्यासाठी देण्यात आलेले पुरावे याची कसून तपासणी करण्याबाबत, तसेच समितीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. याबाबत पोलिस विभागही त्यांच्यास्तरावर सखोल तपास करीत आहेत." 
- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी

Web Title: Did the Tehsildar issue birth certificates to 1,100 Bangladeshis and Rohingyas in Anjangaon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.