धारणी शहर कचऱ्याचे आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:18+5:30
नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धारणी शहर कचºयाचे आगार बनले आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साविण्यात आल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. दुभाजकाच्या मध्ये कचऱ्याचा डोंगर साचला असताना सत्ताधीश व प्रशासनप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे.

धारणी शहर कचऱ्याचे आगार
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धारणी शहर कचºयाचे आगार बनले आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साविण्यात आल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. दुभाजकाच्या मध्ये कचऱ्याचा डोंगर साचला असताना सत्ताधीश व प्रशासनप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे.
शहरात प्रवेश करताना मधवा नाल्याजवळ कचºयाचा ढीग साचलेला दृष्टीस पडत आहे. शहरात पूर्वेकडून गजानन महाराज मंदिरापासून मधवा नाल्यापर्यंत रस्ता दुभाजकाचे काम तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या कामात नगरपंचायत व बांधकाम विभाग यांच्यात सामंजस्य नसल्यामुळे सध्या शहराचे कचराकुंडीत रुपांतर झाले आहे. धारणी शहरातील हृदयस्थळ म्हणून ओळखला जाणारा बसस्थानक परिसर असो की, बसस्थानकापासून मधवा नाल्याकडे जाणारा रस्ता, भारत पेट्रोलपंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक कचरा यार्डमध्ये रुपांतरित झाला आहे. धारणी शहरात येणाऱ्या नागरिकांना शहर बकाल वाटू लागले आहे. याकडे नगरपंचायतीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेता क्षमा चौकस यांनी व्यक्त केले आहे.