रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी तालुक्यात पथदर्शी प्रकल्प उभारणार

By Admin | Updated: July 28, 2015 00:37 IST2015-07-28T00:37:31+5:302015-07-28T00:37:31+5:30

रेशीम उद्योग हा शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना व बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर करून खात्रीलायक मिळकत देणारा रेशीम उद्योग आहे.

For the development of silk industry, a pilot project will be set up in the taluka | रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी तालुक्यात पथदर्शी प्रकल्प उभारणार

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी तालुक्यात पथदर्शी प्रकल्प उभारणार

पालकमंत्री : कृषी विभागाद्वारे ५० एकरांमध्ये तुतीची लागवड
अमरावती : रेशीम उद्योग हा शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना व बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर करून खात्रीलायक मिळकत देणारा रेशीम उद्योग आहे. जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासकीय मालकीच्या ई-क्लास जमिनीवर पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रवण्ीा पोटे यांनी सोमवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली रेशीम उद्योग उभारण्यासाठी महत्त्वाच्या बांबीसंदर्भात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, रेशीम विकास अधिकारी आर. बी. जोगदंड, तांत्रिक सहायक व्ही. पी. पावसकर, अमरावती, अचलपूर, मोर्शी, अंजनगावसुर्जी तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार व नायब तहसीलदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, रेशीम उद्योग हा चांगले उत्पन्न मिळवून देणारा उद्योग आहे. रेशीम उद्योग उभारण्यासाठी प्रामुख्याने तुती झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी अनुकूल वातावरण व जागेच्या उपलब्धतेनुसार तालुक्याच्या ठिकाणी शासकीय मालकीच्या ई- क्लास जमीनीवर पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येणार.
वर्षाकाठी जास्तीत जास्त मिळकत मिळवून देणारा तुती व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आपल्या जमिनीचा तुती या पिकाच्या लागवडीसाठी उपयोग करावा, रेशीम शेती करण्यासाठी शासनाद्वारे सर्वच स्तरावर आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री पोटे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जोगदंड यांनी सांगितले की, रेशीम उद्योग चालू करण्यासाठी सुमारे १ लाख ७५ हजार रुपये लागतात. ४० बाय २० चे आंतर शेड उभारण्यासाठी ८७ हजार ५०० रुपए एवढा खर्च येतो. प्रकल्प उभारण्यासाठी रेशीम संचालनालयाव्दारे अनुदानसुध्दा पुरविण्यात येते. तुतीच्या लागवडीसाठी रेशीम विभागाद्वारे उच्चप्रतीचे तुतीचे बेणे व तयार रोपे शेतकऱ्यांना पुरविण्यात येतात.
एकरी तीन क्विंटल उत्पादनात एक ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळविण्यास मदत होते. बालअळींच्या संगोपनातून निर्माण होणाऱ्या कोषाला प्रतिकीलो १८० रुपये भाव मिळतो. आंतर शेडचे पीक असल्यामुळे निसर्गाद्वारे हानी होऊ शकत नाही. अळ्यांव्दारे खाऊन झालेला पाला गुरांना दुग्धजन्य चारा म्हणून उपयोगात आणणे शक्य होते. तुतीची लागवड केल्यावर साडेतीन महिन्यांत पीक तयार होते. तुतीच्या झाडाचे वय सुमारे १५ वर्षे आहे. शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग केल्यास नक्कीच त्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेशीम उद्योगाव्दारे शेतकऱ्यांना चांगला लाभ होऊ शकतो, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, रेशीम शेतीचे महत्त्त्व लक्षात घेता रेशीम व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतीविषयी माहिती देऊन सदर उद्योग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. यामुळे शेतकऱ्यांना शास्वतीचे पीक घेणे शक्य होईल. त्यामुळे त्यांचे उत्पन्नदेखील वाढेल. परिणामी शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सुटेल.
रेशीम उद्योग उभारण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांना शासकीय जमीनी हस्तांतरीत करण्यात येईल. आदर्श प्रोजेक्ट तयार करण्यासाठी अचलपूर तालुक्यातील पायविहीर येथे १० एकर जमिनीवर तुतीची लागवड करण्यात येईल. अमरावती विभागात रेशीम उद्योग उभारण्यासाठी बचत गटांना सुध्दा प्रवृत्त करण्यात येईल. नांदगांव खंडेश्वर, अंजनगांव सुर्जी, तिवसा, अचलपूरसह जिल्ह्यातील ई-क्लास शासकीय जमिनीवर रेशीम उद्योग उभारण्यात येईल. यावर्षी कृषी विभागाद्वारे ५० एकरामध्ये तुतीची लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. शासनस्तरावर रेशीम उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: For the development of silk industry, a pilot project will be set up in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.