धारणी शहराला अतिक्रमणाला विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:28 IST2020-12-14T04:28:37+5:302020-12-14T04:28:37+5:30

विकासातील सर्वांत मोठी अडचण : अतिक्रमण हटाव मोहीम केव्हा? श्यामकांत पाण्डेय धारणी : नगरपंचायतचा पाच वर्षांचा कार्यकाळ अतिक्रमणाच्या एकमेव ...

Destroy the encroaching city | धारणी शहराला अतिक्रमणाला विळखा

धारणी शहराला अतिक्रमणाला विळखा

विकासातील सर्वांत मोठी अडचण : अतिक्रमण हटाव मोहीम केव्हा?

श्यामकांत पाण्डेय

धारणी : नगरपंचायतचा पाच वर्षांचा कार्यकाळ अतिक्रमणाच्या एकमेव मुद्याभोवती फिरत राहिला. ग्रामसचिव जाऊन मुख्याधिकारी आले. सरपंचाऐवजी नगराध्यक्ष लाभले. मात्र, अतिक्रमण ‘जैसे थे’ राहिले. अतिक्रमण काढण्यात नगरपंचायत अपयशी ठरली. प्रशासकराज जाऊन आता जानेवारी महिन्यात नगरपंचायतसाठी सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यात अतिक्रमण निर्मूलन हा कळीचा प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे.

शहरातील मुख्य मार्गालगतच्या बहुमूल्य शासकीय जमिनीच्या दोन्ही कडा अतिक्रमणधारकांनी वेढल्या आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत आणि महसूल या तिन्ही विभागाने हेतुपुरस्सर डोळेझाक केल्यामुळे आता अतिक्रमण हटविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शहरातील दूरभाष केंद्रापासून मधवा नाल्यापर्यंत रस्त्याच्या कडेवर अतिक्रमणात झुणका भाकर केंद्र, स्टेशनरी, दुकाने, पंक्चर व्यावसायिक, त्याचप्रमाणे इतर किरकोळ दुकानदारांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. नगरपंचायतने नोटीस देऊन स्वत:हून अतिक्रमण काढण्याची सूचना अतिक्रमितांना केली. मात्र, त्यापलीकडे जाऊन पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण काढण्यास नगरपंचायत प्रशासनाने धारिष्ट्य दाखविले नाही.

चोहीकडे अतिक्रमणाचे जाळे

शहरातील जयस्तंभ चौक ते पोलीस स्टेशन मार्गावर असलेल्या त्रिकोणातील शासकीय जागेवर अतिक्रमितांनी व्यवसाय थाटला आहे. पोलीस ठाण्याच्या आवार भिंतीलगतच्या जागेवरील अतिक्रमण निर्मूलनासाठी नगरपंचायतीने साधे प्रयत्न केले नाहीत. याच जागेवर उत्तरेकडे नगरपंचायतने समाजमंदिर बांधले. मात्र, आता ते मोडकळीस आल्यामुळे तिथे नव्याने एक कोटी रुपये खर्च करून नगरपंचायत भवन निर्माण होणार आहे. मात्र, तत्पूर्वी या जागेतील अतिक्रमण काढणे अत्यंत आवश्यक आहे.

दयाराम चौकही अतिक्रमणात

दयाराम चौकातील अतिक्रमणसुद्धा एक मोठी समस्या आहे. माजी राज्यमंत्री दिवंगत दयाराम पटेल यांच्या नावाने ओळखला जाणाऱ्या या चौकातील त्यांच्या पुतळ्याला चारही बाजूने वेढले गेले आहे. त्यांचा अर्धाकृती पुतळा अतिक्रमणात दबला आहे. दिवंगत दयाराम पटेल हे विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांचे वडील होत. त्यामुळे राजकुमार पटेल यांनी दयाराम चौकातील अतिक्रमण हटविण्यास प्राधान्य द्यायला हवे, अशी धारणीकरांची अपेक्षा आहे.

-------------------

Web Title: Destroy the encroaching city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.