देशमुख, बोंडे वगळता 'आयारामां'नी गमावली पत

By Admin | Updated: October 19, 2014 23:14 IST2014-10-19T23:14:45+5:302014-10-19T23:14:45+5:30

महायुती आणि आघाडी विस्कटल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. उद्रेकाची भाषा बोलली जाऊ लागली. दिग्गजांच्या पक्षांतराच्या रूपाने या उद्रेकाला जिल्ह्यात तोंड फुटले.

Deshmukh, except for the bottle, 'Aayaraman' lost his credit | देशमुख, बोंडे वगळता 'आयारामां'नी गमावली पत

देशमुख, बोंडे वगळता 'आयारामां'नी गमावली पत

अमरावती : महायुती आणि आघाडी विस्कटल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. उद्रेकाची भाषा बोलली जाऊ लागली. दिग्गजांच्या पक्षांतराच्या रूपाने या उद्रेकाला जिल्ह्यात तोंड फुटले. एकेकाळी स्वत:च्या पक्षात सन्मानाची पदे भूषविणाऱ्यांनी तिकिटासाठी पक्षनिष्ठा झुगारून विरोधी गटात प्रवेश केला. मात्र, प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर या आयारामांचा फुगा फुटल्याचे दिसून येते. सुनील देशमुख आणि अनिल बोंडे वगळता एकाही ‘आयाराम’ला स्वत:ची पत सांभाळता आली नाही.
२००४ मध्ये काँग्रेसकडून विजयी झालेले सुनील देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भूषविले. ‘विकास पुरूष’ म्हणून त्यांची प्रतिमा होती. त्यामुुळे २००९ मध्ये पक्षाने आपल्यावर विश्वास टाकावा, अशी अपेक्षा देशमुखांना होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रपतिपुत्र रावसाहेब शेखावतांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे दुखावलेल्या सुनील देशमुखांनी अपक्ष निवडणूक लढली आणि रावसाहेबांना कडवी झुंजही दिली. परंतु त्यावेळी ते पराभूत झाले. तरीही सुनील देशमुखांची लोकप्रियता आणि मुस्लिमबहूल भागातील त्यांचे वलय कायमच होते. यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब शेखावतांसाठी सक्षम पर्याय ठरणाऱ्या उमदेवाराची गरज भाजपलाही होती. सुनील देशमुखांना भाजपच्या रूपाने आणि भाजपला देशमुखांच्या रूपाने सक्षम पर्याय सापडला. निकालानंतर देशमुखांनी या संधीचे सोने केले, हे स्पष्ट आहे.
थोड्याफार फरकाने हीच स्थिती मोर्शी-वरूड मतदारसंघातही होती. एकेकाळचे शिवसेनेचे कट्टर समर्थक अनिल बोंडे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन अपक्ष निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्यांनी विदर्भ जनसंग्राम संघटना स्थापन केली. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि प्रचंड मताधिक्याने विजय देखील संपादन केला.
देशमुख आणि बोंडे वगळता जिल्ह्यातील इतर ‘आयारामां’ची अत्यंत वाईट अवस्था झाली. त्यांना त्यांची पतही कायम राखता आली नाही. राणा दाम्पत्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून दिले जाणारे महत्त्व अमान्य करीत विद्रोह करणाऱ्या खोडके दाम्पत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करून बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढविली. कट्टर विरोधक असलेल्या रवी राणांना आव्हान देण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरलेल्या सुलभा खोडकेंना प्रत्यक्षात चवथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागते. हा त्यांचा दारूण पराभव आहे.
अचलपूर मतदारसंघात आयारामांची संख्या सर्वाधिक होती. काँग्रेसच्या माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढविली तर राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या सुरेखा ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून धक्का दिला. मात्र, या दोन्ही महिला उमेदवारांना मिळालेली अत्यल्प मते पाहता त्यांनी विश्वासार्हता गमावली.
भाजपचे तत्कालीन आमदार राहिलेले राजकुमार पटेल यांनी यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. मात्र, त्यांनाही पराभव पत्करावा लागला. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले तिवसा मतदारसंघातील साहेबराव तट्टे असो वा राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झालेले शिवसेनेचे समर्थक दिनेश बुब असो किंवा भाजपच्या पदाधिकारी असूनही ऐनवेळी बसपाकडून मैदानात उतरलेल्या मोर्शीतील मृदुला पाटील असो कोणालाही मतदारांनी स्वीकारले नाही. एकूणच मोर्शीतील अनिल बोंडे आणि अमरावतीतील सुनील देशमुख वगळता जिल्ह्यातील सर्वच आयारामांची अवस्था दयनीय झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Deshmukh, except for the bottle, 'Aayaraman' lost his credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.