गुंजी टेकडी विकासापासून वंचित
By Admin | Updated: August 15, 2015 00:48 IST2015-08-15T00:48:39+5:302015-08-15T00:48:39+5:30
कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या सहवासात तब्बल एक तप राहिलेल्या संत चिंधे महाराज यांचे समाधीस्थळ गुंजी टेकडी अद्याप विकासापासून कोसो दूर आहे़

गुंजी टेकडी विकासापासून वंचित
चिंधे महाराज समाधीस्थळ उपेक्षित : गाडगेबाबांचे सहकारी होते चिंधे महाराज
धामणगाव रेल्वे : कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या सहवासात तब्बल एक तप राहिलेल्या संत चिंधे महाराज यांचे समाधीस्थळ गुंजी टेकडी अद्याप विकासापासून कोसो दूर आहे़
संत चिंधे महाराजांनी वैभवशाली जीवनाला रामराम ठोकून सन १९३४ मध्ये ईश्वराच्या शोधात वयाच्या १६ व्या वर्षी गृहत्याग केला़ राज्यभर गावोगावी फिरून कीर्तन व प्रवचनाद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले़ अंधश्रध्देच्या जोखडात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ इयत्ता चौवथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संत चिंधे महाराजांनी कीर्तनातून समाजातील अनिष्ट चालीरितींवर प्रखर हल्ला चढविला. मंदिरापुढे देवाच्या नावाने शेकडो निष्पाप बोकडांचा बळी दिला जात असे़ त्यांनी पुढाकार घेऊन स्वत:च्या अमोघ वाणीने जागर केला. म्हसोला येथील बळी प्रथा कायमची बंद झाली़
तालुक्यातील गव्हा फरकाडे येथे श्रमदानातून शाळा इमारत उभी केली. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली़ चांदूररेल्वे, कारंजा, बुलडाणा, पुसद या तालुक्यातील अनेक गावांत त्यांनी शाळा बांधल्या़ चिंधे महाराजांनी केलेल्या पाच हजार कीर्तनांमधून अंधश्रध्दा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे कार्य केले़ भजनमाला, समर्थांचे जीवनचरित्र व प्रार्थना, परमार्थ साधना, निष्काम भावनेतील सुविचारांचे तारे, संत गाडगे महाराजांचा नित्यपाठ, संत ज्ञानदर्शक भजनावली, ‘डेबू माझा लेकुरवाळा’ तसेच संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारी भजने त्यांनी लिहिली़ अनेक भजने संत गाडगेबाबा मिशन मुंबईद्वारा प्रकाशित मासिक व ध्वनीफितीतून प्रसारित करण्यात आली़ आधुनिक संत चिंधे महाराज यांनी जन्मभर अंधश्रध्दा दूर करण्याचे कार्य केले़ तालुक्यातील गुंजी येथे त्यांचे समाधीस्थळ असून हे समाधीस्थळ आजही उपेक्षित आहे़ शासन व प्रशासनाने समाधीस्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे़