खोट्या तक्रारप्रकरणी कारवाईची मागणी
By Admin | Updated: July 30, 2014 23:47 IST2014-07-30T23:47:11+5:302014-07-30T23:47:11+5:30
जगदीश देशमुख हे प्रामाणिक वकील असून त्यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी एका महिलेच्या खोट्या तक्रारीवरुन कुठलीही चौकशी न करता फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

खोट्या तक्रारप्रकरणी कारवाईची मागणी
संघ एकवटले : वकील संघाचे निवेदन
अमरावती: जगदीश देशमुख हे प्रामाणिक वकील असून त्यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी एका महिलेच्या खोट्या तक्रारीवरुन कुठलीही चौकशी न करता फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन खोटी तक्रार देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुधवारी अमरावती जिल्हा वकील संघाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल व पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांना निवेदन देणात आले.
तहसील कार्यालयातून हैसियत दाखला काढताना कुठलेही पैसे लागत नसताना वकील जगदीश देशमुख यांनी ८०० रुपये घेऊन पत्नीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप सुरेश कावरे यांनी शहर कोतवाली ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. जगदीश देशमुख हे जिल्हा बार असोसिएशनचे सभासद आहेत. हैसियतनामा, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता केस पेपर तयार करावे लागते. वकिलांना पक्षकारास उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांसमक्ष उभे करुन त्यांना प्रमाणपत्र मिळवून द्यावे लागते. यासाठी योग्य ती फी पूर्वीच आकारण्यात येते. त्यानुसार हैसियत दाखला काढून देण्याची देशमुख यांनी ८०० रुपये फी घेतली. परंतु कल्याणी यांचे पती सुरेश कावरे यांनी देशमुख यांनी आर्थिक फसवणूक केल्याची खोटी तक्रार पोलिसात नोंदविली.
नायब तहसीलदार लबडे हे कावरे यांच्या परिचयाचे असून संगनमताने देशमुख यांना फसविण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केल्यामुळे देशमुख यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन खोटी तक्रार देणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाइच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हा वकील संघाच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी वकील संघाचे प्रकाश देशमुख, मधुसूदन माहुरे, शब्बीर हुसेन, कस्तुब लवाटे अमीत गावंडे, अंकुष वानखडे, अजय तंतरपाडे आदी उपस्थित होते.