तूर उत्पादकांची दैना

By Admin | Updated: March 8, 2017 00:10 IST2017-03-08T00:10:33+5:302017-03-08T00:10:33+5:30

यंदा अधिक उत्पादकता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.

Delight of toor growers | तूर उत्पादकांची दैना

तूर उत्पादकांची दैना

शासकीय खरेदी केंद्रांची स्थिती : गोडाऊनअभावी तीन केंद्र बंद, व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’
अमरावती : यंदा अधिक उत्पादकता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. तुरीला खुल्या बाजारात ‘हमीपेक्षा भाव कमी’ तर शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यापेक्षा व्यापाऱ्यांचाच माल अधिक, त्यांनाच सुविधा यामुळे शेतकऱ्यांची दैना होऊन तुरीचे तेल निघायची वेळ आली आहे. जिल्ह्यात १० पैकी ३ शासकीय तूर खरेदी केंद्र साठवण क्षमता व बारदाण्याअभावी बंद आहेत, तर ज्या केंद्रावर तूर खरेदी सुरू आहे तेथे तूर मोजायला आठवडा उलटतो आहे. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’, अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
यंदाच्या खरिपात सरासरीपेक्षा अधिक पाऊस तसेच आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून कृषी विभागाचे प्रोत्साहन आदींमुळे यंदा दशकातील सर्वाधिक तुरीची क्षेत्रवाढ झाली. एक लाख १४ हजार १९५ सरासरी क्षेत्राच्या तुलनेत एक लाख ३४ हजार ४३९ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली. ही ११८ टक्केवारी आहे. यंदा तुरीची उत्पादकताही हेक्टरी १५ क्विंटलच्या आसपास आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी तुरीचा भाव १० हजार रुपये क्विंटलवर गेला होता. मात्र जसजसा तुरीचा हंगाम जवळ येऊ लागला तसतसे तुरीचे भाव पडायला लागले. शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच भाव ५,०५० रुपये या हमीभावापेक्षा कमी अगदी ३,५०० रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. शेतकऱ्यांची व्यापाऱ्याद्वारा लूट होत असल्याने शासनाने नाफेडद्वारा तूर खरेदी केंद्र सुरू केली. सद्यस्थितीत जिल्ह्यात नाफेडद्वारा चांदूररेल्वे, मोर्शी व नांदगाव खंडेश्वर, भारतीय खाद्य निगमद्वारा अमरावती व धामणगाव तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारा दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार व वरूड तालुक्याच्या मुख्यालयी केंद्र सुरू करण्यात आली. मात्र खरेदी केलेल्या मालास ठेवावयास गोडावून व बारदाना अपुरे यामुळे नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी व दर्यापूर येथील केंद्र सद्यस्थितीत बंद आहे. जी खरेदी केंद्र सुरू आहे तिथे व्यापाऱ्यांची चलती आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. दररोज १००० क्विंटल तुरीचे मोजमाप व आवक दीड ते दोन हजार क्विंटलची यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा केंद्राबाहेर लागत आहे. केंद्रावरील या प्रकाराकडे कोण लक्ष देणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. (प्रतिनिधी)

तूर खरेदी मुदतवाढीचे शासननिर्देश नाहीत
सद्यस्थितीत शासकीय खरेदी केंद्राद्वारा १५ मार्चपर्यंत हमी भावाने तूर खरेदी करण्यात येत आहे. या तारखेनंतरही तूर खरेदी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. साधारणपणे १५ एप्रिलपर्यंत ही खरेदी सुरू राहील, असा कयास आहे. मात्र खरेदीला मुदतवाढ दिली असल्याचे शासनाचे पत्र अजूनही संबंधित यंत्रणेला अपात्र आहे.

आतापर्यंत एक लाख ३७ हजार क्विंटल खरेदी
जिल्ह्यात २६ डिसेंबर २०१६ पासून तूर खरेदीला सुरुवात झाली. सद्यस्थितीत १० केंद्रावर एक लाख ३७ हजार ३०४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. यामध्ये नाफेडद्वारा १७ फेब्रुवारी व एफसीआयद्वारा २८ फेब्रुवारीपर्यंत चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत, तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारा २ मार्चपर्यंतचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

बाजार समितीतही व्यापाऱ्यांनाच सुविधा
येत्या तीन दिवसांत वादळासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली या पार्श्वभूमिवर तूर ओली होऊ नये यासाठी ताडपत्री पुरविणे हे बाजार समितीचे काम, मात्र शेतकऱ्यापेक्षा व्यापाऱ्यांच्या हिताकडे बाजार समित्यांचे लक्ष आहे. मार्केट यार्डातील टिनशेडच्या आत केवळ व्यापाऱ्यांचाच माल आहे. जर पावसाने शेतकऱ्यांच्या तुरी ओल्या झाल्यास नाफेडद्वारा खरेदी होणार नाही, यामध्येही शेतकऱ्यांची लूट होणार, असे चित्र दिसत आहे.

डीएमओ कार्यालयाद्वारा पाच केंद्रांवर ७४ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली व २ मार्चपर्यंतचे पेमेंट करण्यात आलेले आहे. बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना सुविधा पुरवायला पाहिजेत.
- अशोक देशमुख,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी

तालुक्याच्या उत्पादकतेवर सातबाऱ्याची पडताळणी केली जाते व केवळ सातबाराधारक शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाते. गोडाऊनअभावी बंद असलेले नांदगावचे केंद्र लवकरच सुरू करण्यात येईल.
- राजेश विधळे,
जिल्हा पणन व्यवस्थापक

Web Title: Delight of toor growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.