Deepali Chavan Suicide Case: Reddy's bail application rejected | Deepali Chavan Suicide Case: रेड्डीचा जामीन अर्ज फेटाळला; न्यायालयाचा निर्णय

Deepali Chavan Suicide Case: रेड्डीचा जामीन अर्ज फेटाळला; न्यायालयाचा निर्णय

- नरेंद्र जावरे

परतवाडा (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन तथा निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अचलपूर येथील तदर्थ व जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक १ एस. ए. मुंगीनवार यांच्या न्यायालयाने शनिवारी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर फेटाळला.

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला पाठीशी घातल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर आहे. शासनाने त्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांच्यातर्फे वकील दीपक वाधवानी यांनी अचलपूर न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकण्यासाठी ३ एप्रिल ही तारीख ठेवली होती. शनिवारी दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे मांडले. 

त्यानंतर रेड्डी यांचा अर्ज फेटाळण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर, सहायक सरकारी अभियोक्ता डी. ए. नवले व गोविंद विचोरे यांनी सरकारची बाजू मांडली. सदर प्रकरणाच्या तपास अधिकारी तथा एसडीपीओ पूनम पाटील यासुद्धा न्यायालयात हजर होत्या.

अटकपूर्व जामीन किंवा सात दिवसांपूर्वी कळवा 
दीपाली चव्हाण प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करून केव्हाही अटक करू शकतात. त्यामुळे एक तर अटकपूर्व जामीन द्या किंवा अटक करण्यापूर्वी सात दिवसांपूर्वी कळवा, अशी मागणी रेड्डी यांच्यातर्फे वकील दीपक वाधवानी यांनी न्यायालयात केली होती.न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकण्यासाठी ३ एप्रिल ही तारीख ठेवली होती. 

गुन्हा दाखल नाही, तर संरक्षण कशाचे?
रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हाच दाखल नाही. त्यामुळे संरक्षण कशाचे आणि काय द्यायचे, असा प्रश्न न्यायालयाने केला. पोलिसांना विकृत मानसिकतेने त्यांना अटक करायची असती तर तेव्हा त्यांना अटक केली असती. मात्र, गुन्हा दाखल होणार की नाही हेसुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत संरक्षण का द्यायचे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी केला.

Web Title: Deepali Chavan Suicide Case: Reddy's bail application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.