दुष्काळ घोषित करा
By Admin | Updated: July 19, 2014 00:33 IST2014-07-19T00:33:38+5:302014-07-19T00:33:38+5:30
पावसाच्या लहरीपणामुळे मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळसदृश

दुष्काळ घोषित करा
जि.प.कृषी समितीचा ठराव : पालकमंत्र्यांना घालणार साकडे
अमरावती : पावसाच्या लहरीपणामुळे मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, असा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीने मंजूर केला आहे. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा गुरूवारी कृषी विकास अधिकाऱ्यांच्या दालनात पार पडली. पावसाचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही पुरेसा पाऊस पडलेला नाही. जिल्हा अद्याप कोरडाच आहे. खरिपाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पावसाने दडी दिल्याने मूग, उडीद पिकांच्या पेरणीचा कालावधीही निघून गेला. त्यामुळे या पिकांचे पेरणीक्षेत्र घटले.
इतकेच नव्हे तर सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी थोडकाच उरला आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे कृषी सभापती महेंद्रसिंह गैलवार यांनी मांडला. हा प्रस्ताव कृषी समितीच्या सदस्यांनी सर्वानुमते मंजूर करुन तो शासनाकडे पाठविण्याचे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना या सभेत दिले. याशिवाय जिल्ह्यातील पेरणी बाबतची विस्तृत माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. ठोस उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषीविषयक योजना जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्या, असा ठराव देखील कृषी समितीने मंजूर केला.