कोरोनामुळे अनुसूचित जातीमधील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:44+5:302021-06-29T04:10:44+5:30
अमरावती : कोरोनाकाळात अनुसूचित जातीमधील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास परिवाराचे पुनर्वसनासाठी १ ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज ‘स्माईल’ योजनेंतर्गत देण्याचे प्रस्तावित ...

कोरोनामुळे अनुसूचित जातीमधील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत कर्ज
अमरावती : कोरोनाकाळात अनुसूचित जातीमधील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास परिवाराचे पुनर्वसनासाठी १ ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज ‘स्माईल’ योजनेंतर्गत देण्याचे प्रस्तावित आहे. शासनाचा उपक्रम असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची ही योजना आहे.
योजनेमध्ये अर्जदार हा अनुसूचित जातीमधीलच असावा व त्याचे मासिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असावे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील असावा. त्याचे नाव कुटुंबप्रमुखाच्या रेशन कार्डवर असणे महत्त्वाचे आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० चे दरम्यान असावी. कुटुंबप्रमुखाची मिळकत ही कुटुंबाच्या इतर एकूण सदस्यांच्या मिळकतीपेक्षा जास्त असणे महत्त्वाचे आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी महापालिका किंवा नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र तसेच एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय मृत व्यक्तीचा पत्ता, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लाखांपर्यंत), कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला, रेशन कार्ड व वयाचा पुरावा आवश्यक आहे. पात्र, कुटुंबातील सदस्यांनी ही सर्व माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा लिंकवर भरण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.
बॉक्स
सहा टक्के व्याजदर, कर्जपरतीचा कालावधी सहा वर्षे
केंद्र शासनाच्या दिल्ली येथील ‘एनएसएफडीसी’च्या माध्यमातून राज्यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत ही योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यात एनएसएपडीसीचा ८० टक्के सहभाग व २० टक्के भांडवल अनुदान राहील. यावर सहा टक्के व्याजदर व कर्जफेडीचा कालावधी सहा वर्षे राहणार असल्याचे सांगण्यात आले.