मोर्शी शिवारात मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:34+5:302021-09-19T04:14:34+5:30
विहीर खचली, जिवंत वीज तारांसह पोल पडला, पंधरवड्यापासून प्रशासनाने घेतली नाही दखल मोर्शी : मौजा मोर्शी शिवारात सर्व्हे नं. ...

मोर्शी शिवारात मृत्यूचा सापळा
विहीर खचली, जिवंत वीज तारांसह पोल पडला, पंधरवड्यापासून प्रशासनाने घेतली नाही दखल
मोर्शी : मौजा मोर्शी शिवारात सर्व्हे नं. ७४-१ अ मधील विहीर अतिवृष्टीने खचली. त्यात वीजप्रवाही तारा लागलेला खांब कोसळला. या मृत्यूच्या सापळ्याकडे १५ दिवसांपासून महावितरण व महसूल विभागाने लक्ष दिलेले नाही. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
खचलेल्या विहिरीत ३० ऑगस्टलाच जिवंत विद्युत तार असलेला पोल पडला. याबाबत ३० ऑगस्टला तक्रार दाखल करूनही संबंधित विभागांनी दखल घेतली नसल्याचे निवेदन शेतकरी गजानन वाटाणे यांनी तहसीलदारांकडे दिले. त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या शेताजवळून वाहत असलेल्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण दोन वर्षांपासून मंजूर असूनही झाले नाही. परिणामी शेतात नेहमीच पाझर राहतो. यामुळे दलदल निर्माण होऊन ३० ऑगस्ट रोजी विहीर खचून त्यात विहिरीपासून काही अंतरावर असलेला खांबही त्यात कोसळला. परिसरातील शेतकऱ्यांनी डीबीवरून वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत महावितरणला तात्काळ माहिती देऊनही कोणतीही कार्यवाही केली नाही. विहिरीत पोल आणि पिकात व रस्त्यावर तारा पडून आहेत. यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. खचलेल्या विहिरीचा पंचनामा करून शासकीय योजनेतून विहीर दुरुस्ती करून देण्याची वाटाणे यांनी मागणी केली आहे.
गजानन वाटाणे यांच्या शेतामधून गेलेल्या नाल्याचा बंधारा फुटला असून त्याचे पाणी शेतात घुसून पीक सडत आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मंजूर असलेले नाला खोलीकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन २ जानेवारी २०१९ व २४ मे २०२० ला त्यांनी दिले होते. आता तर शेतातच मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न गजानन वाटाणे करीत आहेत.
-----------
मी नुकताच रुजू झालो. मला निवेदन आजच मिळाले. त्यांची समस्या लवकरच सोडविली जाईल.
- अंकुश ठाकरे, सहायक अभियंता, महावितरण