दरड कोसळून मजुराचा मृत्यू; महसूलकडून लपावाछपवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 19:57 IST2019-05-03T19:57:36+5:302019-05-03T19:57:41+5:30
तिवसा (अमरावती) : वर्धा नदीपात्रातून रेती काढण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय मजुराचा दरड अंगावर कोसळून मृत्यू झाला. फत्तेपूर जावरा स्थित ...

दरड कोसळून मजुराचा मृत्यू; महसूलकडून लपावाछपवी
तिवसा (अमरावती) : वर्धा नदीपात्रातून रेती काढण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय मजुराचा दरड अंगावर कोसळून मृत्यू झाला. फत्तेपूर जावरा स्थित वर्धा नदीपात्रात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
यादवराव नागोराव राऊत (५५, रा.फत्तेपूर) असे मृताचे नाव आहे. यादवराव हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता गावालगतच्या वर्धा नदीतील रेती काढण्यासाठी गेले होते. रेती खणताना अचानकपणे त्यांच्या अंगावर दरड कोसळली. त्याखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉल रिसिव्ह होत नसल्याने ग्रामस्थ व कुटुंबाने त्यांचा नदीपात्रात शोध घेतला. रेतीचा मोठा ढीग पात्रात दिसल्याने लोकांचा संशय बळावला. ती रेती बाजूला करताच दबलेल्या अवस्थेत यादवराव मृतावस्थेत दिसले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिवसा ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
रेतीघाट महसूलच्या अखत्यारीत
ज्या ठिकाणी या इसमाचा मृत्यू झाला, तो रेतीघाट तिवसा महसूल विभागाच्या हद्दीत येत असून, या रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. महसूल विभागाने याबाबत लपवाछपवी चालविली आहे. यादवराव कुणासाठी रेतीचे उत्खनन करीत होते, त्याबाबत चौकशी केल्यास वास्तव बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.