कोरोनाबाधिताचा मृत्यू, 'सुपर स्पेशालिटी'त तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:01 IST2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:01:00+5:30
गाडेगनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थिती हाताळली. कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रविभूषण नागभूषण भूषण (४५) यांनी गाडगेनगर पोलिसांत बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दहा ते पंधरा नागरिकांसह एका महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. हे आरोपी साहु नामक कुटुंबातील आहेत.

कोरोनाबाधिताचा मृत्यू, 'सुपर स्पेशालिटी'त तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होऊनदेखील कुटुंबियांना माहिती न दिल्याचा आरोप करून सुपर स्पेशालिटीच्या कोविड रुग्णालयात एका कुटुंबाने मंगळवारी रात्री तोडफोड केली. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडली. कोविड रुग्णालयात त्यामुळे तणाव वाढला होता.
गाडेगनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थिती हाताळली. कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रविभूषण नागभूषण भूषण (४५) यांनी गाडगेनगर पोलिसांत बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दहा ते पंधरा नागरिकांसह एका महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. हे आरोपी साहु नामक कुटुंबातील आहेत.
डॉक्टरांनी धक्काबुक्की केली, अनुप साहू यांची तक्रार
पोलिसांना अनुप मदनलाल साहु (३५ रा. मोरबाग) यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडिल मदनलाल साहु यांना कोरानाची लागण झाली. १८ आॅगस्ट रोजी सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २५ आॅगस्टचे रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अनुप यांनी कुटुंबीयांसह कोविड रुग्णालय गाठले. वडिलांचा मृत्यू कसा झाला, याबाबत त्यांनी डॉक्टरांनकडे विचारणा केली. त्यावेळी डॉ. रविभूषण यांनी शिविगाळ केली. धक्का दिला. तेथील कर्मचारी टांक आणि तायडे यांनी आपणास मारहाण केली. अन्य नातेवाईकांनासुध्दा कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे अनुप साहु यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी डॉ. रविभूषण, टांक आणि तायडे यांच्यासह सात ते आठ जणांविरुध्द भादंविच्या कलम ३२३, ३२४, १४३, १४७, १४९ अन्वये गुन्हा नोंदविला.
मारहाण, तोडफोड केली, डॉ. रवि भूषण यांची तक्रार
मदनलाल साहु यांना कारोना झाला होता. उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झाल्याबाबत कल्पना न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायदेशिर मंडळी जमवून वाद घातला. शासकीय कर्तव्यावर असलेल्या कुशल हरिभाऊ तायडे, दर्शनसिंग टांक यांना मारहाण केली. सुपर स्पेशालिटीतील नियंत्रण कक्षाच्या काचांची तोडफोड केली. शासकीय मालमत्तेचे नुकसान केले, अशी तक्रार डॉ. रवि भुषण यांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी साहु कुटुंबातील दहा ते पंधरा व्यक्ती आणि एका महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ५०४, १४३, १४७, १४९ आणि साथ रोग अधिनियमाचे कलम २,३,४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.