मृत्युपूर्व बयाण घेणे बंद
By Admin | Updated: September 10, 2014 23:16 IST2014-09-10T23:16:43+5:302014-09-10T23:16:43+5:30
महसूल कामाचा ताण बघता गुन्हेगारीशी संबंधित दाखल रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविणे बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत

मृत्युपूर्व बयाण घेणे बंद
नायब तहसीलदार संघटनेचा निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न्यायालयाला पत्र
अमरावती : महसूल कामाचा ताण बघता गुन्हेगारीशी संबंधित दाखल रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविणे बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न्यायालयाला पत्र देण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याकरिता अमरावती, भातकुली तालुक्यातील नायब तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी यांची संयुक्तपणे नेमणूक करण्यात आली आहे. चाकुहल्ला, विषप्राशन, भाजलेल्या रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याची जबाबदारी नायब तहसीलदारांवर आहे; मात्र, काही दिवसांपासून तहसीलदार व नायब तहसीलदारांवर कामांची जबाबदारी वाढली आहे. काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत तहसीलअंतर्गत कामांचा ताण वाढत आहे. हे पाहता महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मृत्युपूर्व बयाण घेणे बंद केले आहे. २९ आॅगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीतील व संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीच रुग्णांचे बयाण घेत आहेत. बयाण घेण्याविषयी तोडगा काढण्याकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना भेटून समस्या कथन केल्या. या समस्येचे निराकरण करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला पत्राद्वारे कळविले आहे. मात्र अद्यापपर्यंत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेणार आहेत. त्यानंतर या समस्येचे निराकरण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
पोलीसच घेतात बयाण
इर्विन रुग्णालयात गुन्हेगारी घडामोडीत रुग्ण दाखल होताच त्यांचे मृत्युपूर्व बयाण घेण्याकरिता तहसीलदार व नायब तहसीलदार यांना फोन करुन बोलविण्यात येत होते. मात्र, त्यांनी २९ आॅगस्टपासून हे बयाण घेणे बंद केल्याने रुग्णांचे बयाण संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी नोंदवीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाची जबाबदारी वाढली आहे.