कुंभाराच्या जीवनात अंधार

By Admin | Updated: October 21, 2014 22:44 IST2014-10-21T22:44:59+5:302014-10-21T22:44:59+5:30

दिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही

Darkness in the life of a potter | कुंभाराच्या जीवनात अंधार

कुंभाराच्या जीवनात अंधार

सुरेश सवळे - चांदूरबाजार
दिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही मातीच्या पणत्यांना विशेष महत्व आहे. सर्व समाजाची दिवाळी प्रकाशमय पणत्यांनी उजळून टाकणाऱ्या कुंभाराचे जीवन मात्र अंधारमय झाले असल्याचे वास्तव आहे.
गावातील परंपरा जपणारा कुंभार मातीच्या पारंपारिक पणत्या आजही आपल्या हातांनी त्यांना आकार देतो आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या कलाकुसरीच्या पणत्यामुळे मातीच्या पणत्याकडे ग्राहक पाठ फिरवित आहेत.
चोवीस तासावर आलेल्या दिवाळीने चांदूरबाजार शहरातील जयस्तंभ चौक, गांधी चौक, आठवडी बाजार चौकात पणत्या, मापुल विकणाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यात आकर्षक अशा इंग्रजी मातीच्या, प्लास्टर आॅफ पॅरीसच्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्याच्याच जोडीला इलेक्ट्रीक पणत्याही सजल्या आहेत. त्यामुळे स्थानिक कुंभार जातीच्या कारागिरांनी पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या मातीच्या पणत्याची मागणी अत्यंत कमी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
लक्ष्मीपुजनासाठी लागणाऱ्या पाचच मातीच्या पणत्या आणि मापुल या पलिकडे मातीच्या पणत्यांना आज तरी बाजारात फारशी मागणी दिसत नाही. आज विद्युत रोषणाईला सुगीचे दिवस आल्याने मातीच्या पणत्याची मागणी कमी झाली आहे. साधारणपणे पाच दिवस चालणाऱ्या दिवाळीतील लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घरात, घरासमोरील प्रवेशद्वारात नक्षीदार रांगोळीवर घराच्या छतावर ओळीने पणत्या पेटविल्या जातात.
वर्षातील दिवाळी हा महत्वाचा सण असल्याने परिसरातील कुंभार व त्यांचे कुटूंब तीन-चार महिन्यापूर्वी पासून फिरत्या चाकावर आपल्या हातानी मातीच्या पणत्या बनविण्याच्या कामाला लागलेला असतो. नदीकाठावरील गाळाच्या मातीत घोड्याची लिद मिसळून या मातीला पाण्याने भिजवून ८ ते १० दिवस या मातीवर मेहनत करतो. त्यानंतर तयार मातीपासून पारंपारिक पणत्या तयार केल्या जातात. नंतर त्याला आव्यामध्ये भाजून गेरूच्या पाण्यात बुडवून रंग दिल्या जातो. या सगळ्या संस्कारातून तयार झालेल्या गावरान पणत्याकडे ग्राहकांनी मात्र पाठ फिरविली आहे. सर्व समाजाची दिवाळी आपल्या कलाकुसरीने प्रकाशमय करणाऱ्या कुंभाराचे जीवन अंधारमय झाले आहे. दिवाळीच्या पारंपारिक लोकगीतात ‘चला जाऊ कुंभार पाहू, कुंभार माती काय तुडवितो’ यासारखे गीत म्हटले जाई आज कुंभार असतांनाही त्याच्या मातीला मोलही राहीले नाही. दिवाळीच्या लोकगीतातून आणि आजच्या समाज जीवनातून एकेकाळचा बलुतेदार असलेला कुंभार आधुनिक काळात मात्र उपेक्षितच राहीला आहे.

Web Title: Darkness in the life of a potter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.