सोशल मीडियाचा अभ्यासासाठी उपयोग करणारी दापोरी जि.प. शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:54+5:30
सातपुडा पर्वतरांगेच्या पायाथ्याशी असलेल्या या शाळेत केजी ते ७ वीपर्यंत प्रवेश आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पटसंख्या टिकविणारी, अशी या शाळेची नोंद आहे. लोकसहभागातून शाळेचा चेहरा-मोहरा बदलविण्यात आला असून, आज २३५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. डिजिटल वर्गखोल्या, शालेय साहित्य मूल्याधिष्ठित शिक्षण, भांडार, आयडीआय टॉवर, सुसज्ज संगणक कक्ष, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी, ‘डे टू डे’ पाढे पाठांतर, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.

सोशल मीडियाचा अभ्यासासाठी उपयोग करणारी दापोरी जि.प. शाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थ्यांना पुस्तिकी ज्ञानासह अद्ययावत शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी सोशल मीडियाचा अभ्यासासाठी उपयोग केला जातो. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी असा विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणारी मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा जिल्ह्यात एकमात्र ठरलीे.
सातपुडा पर्वतरांगेच्या पायाथ्याशी असलेल्या या शाळेत केजी ते ७ वीपर्यंत प्रवेश आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पटसंख्या टिकविणारी, अशी या शाळेची नोंद आहे. लोकसहभागातून शाळेचा चेहरा-मोहरा बदलविण्यात आला असून, आज २३५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. डिजिटल वर्गखोल्या, शालेय साहित्य मूल्याधिष्ठित शिक्षण, भांडार, आयडीआय टॉवर, सुसज्ज संगणक कक्ष, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी, ‘डे टू डे’ पाढे पाठांतर, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. बहुतांश पालक खासगीऐवजी याच शाळेत पाल्यांना प्रवेश देतात. त्यामुळे दरवर्षी पटसंख्या वाढत आहे. शाळेच्या आर्कषक भिंती व बोलका परिसर, परस बाग, विद्यार्थ्यांना बचतीचे धडे, सुसंस्काराचे शिक्षण मिळत आहे. शाळेला खरी भरारी लोकसहभागातून मिळाली आहे. शालेय साहित्य भंडार हे विद्यार्थी सांभाळतात. शाळेत अद्यावत शिक्षणासाठी विविध साहित्य हाताळण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे. दापोरी येथील शाळेने राबविलेले उपक्रम बघण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत नरखेड शाळेच्या शिक्षकांनी २० फेब्रुवारी रोजी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ग्रामस्थांना आपुलकी
दापोरी येथील शाळेबाबत ग्रामस्थांना ‘आपली शाळा, माझी शाळा’ अशी आपुलकी आहे. लोकवर्गणीतून संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, प्रोजेक्टर, टिव्ही, डिजिटल बोेर्ड , पाणी शुद्धिकरण यंत्र व अन्य पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत.
कार्यानुभव तासिकेतील श्रमप्रतिष्ठा, मूल्य जोपासता यावे, यासाठी विद्यार्थ्यांनी परसबाग फुलवली आहे. परसबागेत वाफे तयार करणे, बिजारोपण करणे, रोपांची काळजी घेणे, पाणी देणे आदी बाबी स्वत: विद्यार्थी करतात. परसबागेतून खिचडीसाठी भाजीपाला उपलब्ध होतो.
पारंपरिक शिक्षणाला फाटा
शाळेत पारंपरिक शिक्षण पद्धतीला फाटा देत ‘ए’ फॉर अॅपल न शिकविता अटलबिहारी, तर ‘बी’ फॉर बाबासाहेब आंबेडकर असे शिकविले जाते. वकृत्व शैलीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे.
शाळा विकासासाठी सरपंच, उपसंरपचांचे भरीव योगदान आहे. शिक्षकांमध्ये विद्यार्थीनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, व्यवसायनिष्ठा असली की सर्व काही सुकर होते. सुसंस्कारीत, मूल्याधिष्ठिीत पिढी निर्माण करता येते, हे शिक्षकांनी सिद्ध केले आहे. लोकसहभाग महत्वाचा ठरला.
- गजानन चौधरी, मुख्याध्यापक