धारणीत वादळी पाऊस लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:19:29+5:30
बुधवार आणि गुरूवारच्या सायंकाळी आलेल्या चक्रीवादळासह पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

धारणीत वादळी पाऊस लाखोंचे नुकसान
श्यामकांत पाण्डेय धारणी
बुधवार आणि गुरूवारच्या सायंकाळी आलेल्या चक्रीवादळासह पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. एमएसईबी विभागाचे धारणी फीडर वगळता सर्व फीडर बंद पडल्याने मागील ४८ तासांपासून १३६ गावे अंधारात आहे. सुसर्दा, बिजुधावडी, बैरागड आणि पाटीया या भागातील अनेक विद्युत खांबांवर शेकडो वृक्ष कोलमडून पडल्याने वीज व्यवस्था खंडित झाली आहे. बुधवारी सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान अचानक चक्रीवादळाला सुरूवात झाली. सोबत विजेच्या कडकडाटात वाऱ्याच्या वेगात पावसानेही दीड तास हजेरी लावली. त्यामुळे डाबका ते धारणीला येणाऱ्या ३३ केव्ही लाईनवर शेकडो झाडे पडल्याने विजेची तार तुटून वीज व्यवस्था खंडित झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्ष पडल्याने गुरुवारी दुपारपर्यंत रस्ता दुरूस्त करण्यात आला. रात्रीपर्यंत एमएसईबीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिकांच्या सहाय्याने २० इलेक्ट्रिक पोलचे काम करून रात्री वीजपुरवठा सुरू करण्यात यश मिळविले. मात्र बैरागड, पाटीया, बिजुधावडी व कळमखार परिसरातील वीज व्यवस्था अद्यापही खोळंबलेलीच आहे. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने खासगी मजुरांचा वापर करून लवकरच सर्व भागातील विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यात येईल, असे सहायक अभियंता संजय गजभिये यांनी सांगितले. नुकसानीबाबत विचारले असता सध्या पाहणी व सोबतच दुरूस्तीचे काम काम सुरू असल्याने किती नुकसान झाले असेल याचा अधिकृत अंदाज बांधणे कठीण असल्याचे ते म्हणाले. आमची सर्वात पहिली प्राथमिकता पूर्ण तालुक्यातील विद्युत व्यवस्था सुरू करण्यावर राहणार असल्याचे ते म्हणाले. चिलाटी या गावातील एका बैलबंडीवर मोठे वृक्ष पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला तर सुदैवाने गाडीमालक बचावला. धारणी ते कळमखार मार्गावर अनेक ठिकाणी गुलमोहर व पळसाचे खोड पडले होते. त्यांना तातडीने उचलून मुख्य मार्ग मोकळा करण्यात आला. तलई कँप भागात वन विभागाच्या तपासणी नाक्यासमोर गुलमोहरचे मोठे वृक्ष पडून वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती. लोकांनी तातडीने झाड बाजूला सारून मार्ग सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. सुसर्दा ते राणापिसा या दरम्यान सर्वाधिक झाडे पडली होती. मुख्य वीज वाहिनीलासुद्धा याच भागात फटका बसला. एपीएमसीच्या प्रांगणात दि ग्रेट चॅम्पियन सर्कस सुरू होते. सायंकाळचा खेळ सुरू होण्यापूर्वीच चक्रीवादळाने पूर्ण तंबू उखडून गेल्याने त्यांचे जीवन उघड्यावर आले आहे. इस्सार पेट्रोल पंपासमोरही मोठे वृक्ष कोसळले. चौथमल मार्केटवरही मोठ्या वृक्षाच्या फांद्या पडल्याने नुकसान झाले. अनेक गावांतील घरांचे टिनपत्रे व छप्पर उडाल्याने जनजीवन उघड्यावर आले आहे. दुकानांचे टिनशेड व तंबू सुद्धा उडून गेले होते. एकंदरीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याची पाहणी करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजय मीना यांनी तहसीलदारांना दिले आहे. मंडळ अधिकारी व तलाठ्यांकडून नुकसानीचा अहवाल तहसीलदार बी. आर. खांदवे यांनी मागितला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने एकीकडे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी उकाड्यापासूनही नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.