सिलिंडर बनले गॅस बॉम्ब ?

By Admin | Updated: January 22, 2017 00:02 IST2017-01-22T00:02:38+5:302017-01-22T00:02:38+5:30

शहरात पंधरवड्यात घडलेल्या सिलिंडर भडक्याच्या तीन घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Cylinder gas bombs? | सिलिंडर बनले गॅस बॉम्ब ?

सिलिंडर बनले गॅस बॉम्ब ?

स्फोटांची मालिका : घरात आम्ही सुरक्षित किती ?
वैभव बाबरेकर अमरावती
शहरात पंधरवड्यात घडलेल्या सिलिंडर भडक्याच्या तीन घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तांत्रिक सदोषता, नियमित तपासणीचा अभाव आणि ग्राहकांना अपुरे मार्गदर्शन यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गॅस वितरकांकडूनच ग्राहकांच्या सिलिंडरच्या सुरक्षेसंबंधित योग्य ती प्रक्रिया राबविली जात नसून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे जिल्हा प्रशासनसुद्धा आपल्या जबाबदारीतून हात झटकत आहेत.
जिल्हाभरात विविध कंपन्यांचे ४१ गॅस वितरक आहे. ते तब्बल ४ लाख ५० हजार ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचवितात. गॅस सिलिंडर ग्राहकांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीच्या वितरकांची असते. त्यांचे हे कार्य त्यांनी नेमलेल्या 'डिलिव्हरी बॉय'ची असते. ग्राहकांच्या घरापर्यंत गॅस सिलिंडर पोहोचविल्यानंतर संबंधित 'डिलिव्हरी बॉय'ने त्या सिलिंडरचे वजन, गॅस लिकेज तपासून घेणे आवश्यक आहे. सर्व अचूकतेची खातरजमा झाल्यानंतर सिलिंडर शेगडीला जोडून देणे, शेगडीची ज्योत व्यवस्थित पेटते आहे किंवा नाही, हे तपासून बघणे बंधनकारक आहे. मात्र, यापैकी एकही बाब 'डिलिव्हरी बॉय' करीत नाही. ग्राहकांना मार्गदर्शनदेखील केले जात नाही.
पंधरवड्यात शहरातील तीन ठिकाणी घरगुती गॅस गळती होऊन भडका उडाला. नवसारीतील एका हॉटेल टपरीवर सिलिंडरचा भडका उडाला. या अचानक झालेल्या स्फोटामुळे एका विद्यार्थिंनीचा मृत्यू झाला, तर दुसरीदेखील गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. शुक्रवारी रविनगरात झालेल्या सिलिंडरच्या भडक्याने दोन महिलांसह एक चिमकुली भाजली गेली.

डीएसओ, कलेक्टर यांचीही जबाबदारी!
वितरकांनी सिलिंडरच्या सुरक्षेसंबंधी नियमांचे काटेकोर पालन केले जाते की नाही याकडे लक्ष पुरविले असते. ग्राहक जागृती करण्यासंबंधी नियमित पावले उचलली असती, तर गॅस भडक्याने गेलेला तरुणीचा जीव आणि इतरांना झालेली शारीरिक हानी टळू शकली असती. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अखत्यारित जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखडे हे कार्यरत आहेत. रांगेने तीन अपघात घडलेत. पुरवठा विभाग हललाही नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची खरे तर झोप उडायला हवी होती. वानखडेंच्या संवेदना बोथट झाल्या असतील तर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या अत्यंत गंभीर मुद्याची स्वत:हून दखल घ्यायलाच हवी. घराघरांतील सिलिंडर्स गॅस बॉम्ब बनलेले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अस्वस्थ होऊ नये काय ?

गॅस सिलिंडरच्या सुरक्षेची जबाबदारी गॅस वितरकांची आहे. अपघातानंतरची तपासणी गॅस कंपनीच्या एरिया सेल्समनची जबाबदारी आहे. आमचा संबंध केवळ पुरवठ्याच्या आकडेवारीशी आहे. गॅस वितरकांची बैठक बोलविली आहे.
- डी.के.वानखडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी

सिलिंडरची डिलिव्हरी करताना रिक्षावाल्यांनी तपासणी केलेलेच सिलिंडर ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. ग्राहकांनीही आपली जबाबदारी समजून सिलिंडरची तपासणी करून घ्यावी. या घटनेच्या अनुषंगाने 'डिलिव्हरी बॉईज्'ची बैठक बोलावून त्यांना कडक सूचना देण्यात येतील.
- संजय देशमुख, अध्यक्ष,
अमरावती गॅस डिस्ट्रिब्युटर असोशिएशन

Web Title: Cylinder gas bombs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.