संचारबंदीत शिथिलता, आजपासून सर्व दुकाने उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST2021-03-06T04:12:49+5:302021-03-06T04:12:49+5:30
अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत काही शिथिलता आणून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ४ ...

संचारबंदीत शिथिलता, आजपासून सर्व दुकाने उघडणार
अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत काही शिथिलता आणून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ४ या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, कोरोनाची साथ वाढू नये, म्हणून सर्वांकडून ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेव्हिअर’चे पालन काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. ते न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी दिला.
संचारबंदीत शिथिलता आणून दुकानांना परवानगी देणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जारी केला. या आदेशाचे पालन शनिवार, ६ मार्चपासून सकाळी ६ वाजतापासून अमरावती महापालिका क्षेत्र, तसेच जिल्ह्यातील इतर शहरी व ग्रामीण क्षेत्रात लागू होईल. आरोग्य, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आदी अत्यावश्यक सेवा पूर्णपणे सुरू राहतील. इतर शासकीय कार्यालयांत १५ टक्के किंवा किमान १५ व्यक्ती उपस्थित असाव्यात, असे आदेश आहेत.
------------------
- तर पाच दिवस दुकाने होणार सील
सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझर आदी आवश्यक दक्षतेचे नियम दुकानदारांकडून पाळले जात नसतील, तर पाच दिवस दुकान सील व आठ हजार रुपये दंड संबंधितांवर ठोठावण्यात येणार आहे. त्यासाठी दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज वेळोवेळी तपासण्यात येणार आहे. सर्व दुकाने, आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
---------------------
दुकानात ‘नो मास्क- नो एन्ट्री’चे पालन व्हावे
‘नो मास्क- नो एन्ट्री’ पद्धत राबविणे दुकानांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसे फलकही प्रत्येक ठिकाणी लावण्याचे निर्देश आहेत. ग्राहकांनीही खरेदीसाठी घराजवळच्या दुकानांची निवड करून लांबचा प्रवास शक्यतो टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
-------------------
लॉजिंग २५ टक्क्यांच्या क्षमतेत; उपहारगृहांना पार्सलची परवानगी
लॉजिंग व्यावसायिकांना त्यांच्या क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत व्यवसाय चालवता येईल. मात्र, ग्राहकांना त्यांच्या कक्षात जेवणाची व्यवस्था करावी. खाद्यपदार्थ सीलबंद असावेत. नियमभंग केल्यास लॉजला पाच दिवस सील व १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल. सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स, खाद्यगृहे प्रत्यक्ष सुरू न ठेवता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार्सल सुविधा पुरवू शकतील.
--------------------
लग्न समारंभात २० व्यक्तींना परवानगी
लग्न समारंभासाठी केवळ २० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. मात्र, या व्यक्तींनी शक्यतो ‘अँटिजेन टेस्ट’ करून घेण्याच्या सूचना आहेत. वधु किंवा वर यांचे घर किंवा घराच्या परिसरात लग्न समारंभ आयोजित करता येईल. तिथे सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर न झाल्यास आयोजकाला २० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. लग्नाच्या आयोजनाची परवानगी देण्यासाठी महापालिका क्षेत्रात आयुक्त, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांना व इतर ग्रामीण क्षेत्रात तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
--------------------------
- मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत. तथापि, चारचाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त ३ प्रवासी, तर तीनचाकी गाडीत (ऑटोरिक्षा) चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, तर दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह २ प्रवाशांना प्रवासाची परवानगी आहे.
- ठोक भाजीमंडईत पहाटे २ ते सकाळी ६ या कालावधीत व्यवहार होतील, मात्र, तिथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश असेल. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
---------
हे असेल बंद
महापालिका तसेच इतर शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस, सर्व चित्रपटगृहे व बहुविध चित्रपटगृहे, व्यायामशाळा, तरणतलाव, करमणूक उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने बंद राहतील.
-----------------