गजानन मोहोड - अमरावतीमृत्यूच्या दाढेत विव्हळत असलेल्या व्यक्तीने दिलेले मृत्यूपूर्व बयाण हा शेवटचा पुरावा असतो. यानंतरही काही संशय निर्माण झाल्यास ती व्यक्ती स्पष्टीकरण देण्यासाठी येऊच शकत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मृत्युपूर्व बयाण नोंदविताना सर्व प्रकारचे नियम पाळणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नाही. त्यामुळे मृत्युपूर्व बयाणच आरोपीच्या दोषमुक्तीचा पुरावा ठरत आहे.मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याचा अधिकार पोलीस अधिकारी तहसीलदार, नायब तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना आहे. त्यांना शक्य झाले नाही तर वैद्यकीय अधिकारी बयाण नोंदवू शकतात, अशी कायद्यात तरतूद आहे. मृत्युपूर्व बयाण नोंदविताना संबंधित व्यक्ती बयाण देण्यास सक्षम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेणे व बयाण घेताना वैद्यकीत अधिकारी उपस्थित असणे, बयाण नोंदविल्यावर बयाण देणारी व्यक्ती पूर्णपणे शुध्दीवर होती, हे वैद्यकीय अधिकाऱ्याचे दुसरे प्रमाणपत्र घेणे बयाण स्वत:च्या हाताने लिहून काढणे, नोंदविलेल्या बयाणाला लाखेचे सील लावणे, लिफाफा तपासणी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करणे आदी बाबींचे पालन करणे अनिवार्य आहे. परंतु अनेक अधिकारी नियम धाब्यावर बसवून कार्य करीत असल्याने मृत्युपूर्व बयाणासारखा महत्त्वपूर्ण पुरावा आरोपीला दोषी सिध्द करण्यास अपयशी ठरत आहे.अधिकाऱ्यांना एक तर नियमांची पुरती माहिती नसावी किंवा या कार्यात गैरव्यवहार होत असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. न्यायालयात तथ्यांच्या आधारावर प्रकरणे निकाली काढली जातात. तथ्य तपासताना संशय आल्यास त्याचा लाभ आरोपीला दिला जातो.
सदोष मृत्युपूर्व बयाणामुळे होताहेत आरोपी दोषमुक्त
By admin | Updated: December 8, 2014 22:29 IST