पतीची आधी केली हत्या, नंतर फासावर लटकविले; आत्महत्येचा बनाव केला पण..
By प्रदीप भाकरे | Updated: October 5, 2023 18:14 IST2023-10-05T18:12:33+5:302023-10-05T18:14:16+5:30
आरोपी पत्नीला अटक, हंतोडा येथील घटना

पतीची आधी केली हत्या, नंतर फासावर लटकविले; आत्महत्येचा बनाव केला पण..
अमरावती : कौटुंबिक कलहातून पत्नीने पतीची बेलण्याने जबर हल्ला चढवून हत्या केली. त्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतु, शवविच्छेदन अहवालावरून सहा दिवसांनी तिचे बिंग फुटले. ही घटना २९ सप्टेंबर रोजी अंजनगाव सुर्जी ठाण्याच्या हद्दीतील हंतोडा येथे घडली. या प्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.
नीलेश शंकरराव इंगळे (३५, रा. हंतोडा असे मृतक तर जया नीलेश इंगळे (३२, रा. हंतोडा) असे अटक आरोपीचे नाव आहे. नीलेश व जया यांच्यात नेहमी कौटुंबिक कारणावरून वाद होता. २९ सप्टेंबर रोजीही त्यांच्यात वाद उद्भवला. या वादात जयाने पती नीलेशवर बेलण्याने हल्ला चढविला. त्यात नीलेशचा मृत्यू झाला. त्यानंतर जयाने पती नीलेश यांनी राहते घरी अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव करून अंजनगाव सुर्जी पोलिसांना माहिती दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास आरंभला. पंचनाम्यादरम्यान मृतक नीलेशच्या शरीरावर रक्ताचे डाग व मारहाणीच्या खूणा दिसून आल्याने पोलिसांना संशय आला. त्यात मृतक नीलेशच्या आई-वडिलांनीही मुलाची हत्या करून गळफास लावल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.
पीएम रिपोर्टने फोडले बिंग
शवविच्छेदन अहवालावरूनही जबर मारहाणीमुळे नीलेशचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मृतक नीलेशचे वडील शंकरराव त्र्यंबक इंगळे (७०, रा. हंतोडा) यांची तक्रार व शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी बुधवारी आरोपी जया इंगळेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद धाडसे करीत आहेत.