अमरावतीतील CRPF जवानाला हृदयविकाराचा झटका, नव्या घरात प्रवेश करण्याआधीच मृत्यूनं गाठलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 20:34 IST2020-01-29T18:20:36+5:302020-01-29T20:34:32+5:30
नजीकच्या माणिकपूर येथील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान पंजाब जनीराम उईके (४८) यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले.

अमरावतीतील CRPF जवानाला हृदयविकाराचा झटका, नव्या घरात प्रवेश करण्याआधीच मृत्यूनं गाठलं
बेनोडा शहीद (अमरावती) : वरूड तालुक्यातील माणिकपूर येथील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान पंजाब जनीराम उईके (४८) यांचा मंगळवारी सकाळी कमी रक्तदाबामुळे काश्मीर येथे कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. गुरुवारी माणिकपूर या गावी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
काश्मीर येथे कर्तव्यावर असताना रक्तदाब कमी होऊन त्यांना हृद्याघात झाल्याच्या माहितीस मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी दुजोरा दिला. नागपूर मुख्यालयांतर्गत सीआरपीएफच्या सेकंड बटालियनमध्ये त्यांनी सुकमा येथे सेवा दिली. त्यांची नुकतीच तेथून काश्मीरमध्ये बदली झाली होती. दोन वर्षांनी त्यांच्या सेवेचा बाँड संपणार होता. वरूड येथे त्यांनी नुकतेच घर घेतले होते. गृहप्रवेशापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
एकूण चार भावांपैकी पंजाब उईके यांचा क्रमांक दुसरा आहे. त्यांच्या पश्चात आई रखमाबाई (७०), तीन भाऊ, पत्नी चंद्रा (४२), नववीत शिकणारा मुलगा व पाचवीत शिकणारी मुलगी आहे. मितभाषी असलेले पंजाब उईके यांचा माणिकपूर परिसरात चांगला संपर्क होता. गावी आल्यानंतर वॉटर कप स्पर्धेसारख्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांचे पार्थिव ३० जानेवारी रोजी सकाळी ७ च्या सुमारास वरूडला आणले जाईल.