विद्यापीठात मूल्यांकनासाठी परीक्षकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:56+5:30
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याची नियमावली आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने गत तीन ते चार वर्षांपासून ऑनलाइन, ऑफलाइन निकालाची बोंबाबोंब कायम आहे. हल्ली हिवाळी परीक्षेत ऑनलाइन कामकाजाला तूर्तास फाटा देण्यात आला आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे हिवाळी २०१९ परीक्षांमध्ये फेररचना करण्यात आली.

विद्यापीठात मूल्यांकनासाठी परीक्षकांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मूल्यांकनासाठी परीक्षकांनी एकच गर्दी केली आहे. परीक्षा विभागात शुक्रवारी मूल्यांकनासाठी ३०० पेक्षा अधिक परीक्षकांनी हजेरी नोंदविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एरवी परीक्षकांना मूल्यांकनासाठी पाठवा, अशी विनंती परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांना बरेचदा करावी लागतोे. मात्र, उन्हाळी २०१९ परीक्षेत मूल्यांकनासाठी टाळाटाळ करणाऱ्या परीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने ही गर्दी होत असल्याचे वास्तव आहे.
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याची नियमावली आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने गत तीन ते चार वर्षांपासून आॅनलाइन, आॅफलाइन निकालाची बोंबाबोंब कायम आहे. हल्ली हिवाळी परीक्षेत ऑनलाइन कामकाजाला तूर्तास फाटा देण्यात आला आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे हिवाळी २०१९ परीक्षांमध्ये फेररचना करण्यात आली. ३१ ऑक्टोबरपासून बॅकलॉग विषयाच्या परीक्षांना प्रारंभ झाला असून, १४ नोव्हेंबरपासून नियमित परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यापीठ अंतर्गत १५२ महाविद्यालयातील केंद्रावर परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा आणि मूल्यांकन एकाच वेळी सुरू करण्यात आले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार मूल्यांकनासाठी नियोजित वेळेत परीक्षकांनी हजर राहावे, यासाठी प्राचार्य, विषय प्राध्यापकांना ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. मूल्यांकनासाठीचे पत्रसुद्धा पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून मूल्यांकनास प्रारंभ झाले आहे. मध्यंतरी दिवाळी सुट्यांमुळे मूल्यांकनासाठी परीक्षकांची हजेरी अत्यल्प होती. आता ही गर्दी वाढू लागली आहे. परीक्षा विभागात मूल्यांकनासाठी जागा कमी पडत असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत परीक्षकांची संख्या वाढणार आहे. मात्र, हा बदल परीक्षकांवर दंडात्मक कारवाई आणि सेवापुस्तिकेत नोंद यामुळे झाल्याची चर्चा जोरात आहे.
मूल्यांकनासाठी परीक्षकांनी वेळेत हजर राहावे, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्राचार्यासोबत संवाद आणि परीक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे. मेलद्वारे नियुक्ती आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा परीक्षकांची मूल्यांकनासाठी गर्दी वाढत आहे. निर्धारित कालावधीत मूल्यांकन होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ