तूर नोंदणीसाठी केंद्रावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:45+5:30
नांदगावातील खरेदी-विक्री संस्थेत नाफेड तूर खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. गतवर्षी येथील केंद्राला तूर खरेदीसाठी ३ हजार ६६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ३८० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली होती. खासगी तूर खरेदी चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सुरू आहे, तर शासनाचा हमीभाव ५८०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.

तूर नोंदणीसाठी केंद्रावर गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : शासनाच्या नाफेड तूर खरेदीसाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. पहिल्या दिवशी सुमारे ९०० शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज सादर केले. नोंदणीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी उसळल्याने पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. नोंदणीची प्रक्रिया १४ फेब्रुवारीपर्यंतच असल्यामुळे शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.
नांदगावातील खरेदी-विक्री संस्थेत नाफेड तूर खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. गतवर्षी येथील केंद्राला तूर खरेदीसाठी ३ हजार ६६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ३८० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली होती. खासगी तूर खरेदी चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सुरू आहे, तर शासनाचा हमीभाव ५८०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.
नाफेड व खासगी तुरीला मिळणाऱ्या भावात सुमारे आठशे ते हजार रुपयांची तफावत असल्याने नाफेडकडे तूर विक्रीसाठी आणण्यास शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यादृष्टीने येथे सुविधा व्हाव्यात, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर तूर नोंदणी केंद्रांवर महिन्याभरापासून नोंदणीचे काम सुरू झाले होते. पण, नांदगाव खंडेश्वर येथील केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला उशिरा मान्यता मिळाली. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता खरेदी केंद्रावरील नोंदणीची मुदत वाढवून देण्यात यावी, अन्यथा तालुक्यातील बरेच शेतकरी वंचित राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.