पिके कोमात, दाटले चिंतेच ढग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:33+5:302021-07-08T04:10:33+5:30
(फोटो) अमरावती : जिल्ह्यात १ जुलैपासून पावसाची दडी असल्याने सुरुवातीला पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी कोमात गेली आहेत. याशिवाय ...

पिके कोमात, दाटले चिंतेच ढग
(फोटो)
अमरावती : जिल्ह्यात १ जुलैपासून पावसाची दडी असल्याने सुरुवातीला पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी कोमात गेली आहेत. याशिवाय पावसाच्या खंडाअभावी या आठवड्यात झालेल्या ९३ हजार हेक्टरपैकी किमान ५० हजार हेक्टरमधील पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ७ जुलैनंतर पावसाची शक्यता सांगितली असली तरी एकूण स्थिती पाहता चिंतेचे ढग दाटून आले आहेत.
जिल्ह्यात १० जूनला झालेल्या सार्वत्रिक पावसानंतर मान्सूनचे वेळेआधी आगमन झाल्याची शुभवार्ता हवामान विभागाने दिली. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त झाला. ९ व ११ जूनला जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनीदेखील मृग नक्षत्रात पेरण्यांना सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. पाऊस फक्त काही भागात विखुरल्या स्वरूपात झाला. जमिनीत आर्द्रता असल्याने पिकांना काही काळ तग धरली. आता पावसात खंड असल्याने व तापमानात वाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे बळराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यात मंगळवारपर्यत ६,९८,७९६ पैकी ५,२०,२८१ हेक्टरमध्ये पेरणी झाली. यापैकी या आठवड्यात ९३,६६९ हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या आहेत. पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही भागातील जमिनीत ओल असल्याने बीजांकुर निघाले. मात्र, कमी आर्द्रता असलेल्या भागातील सोयाबीन बियाणे जमिनीत कुजायला लागले आहे. काही शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात खांडण्या असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.
बॉक्स
कोवळ्या पिकांवर माकडांसह वन्यप्राण्यांचे संकट
सुरुवातीच्या टप्प्यात पेरणी झालेली पिकांना माकडांच्या टोळ्या व काही भागात हरिण, निलगाय आदी फस्त करीत आहेत. याशिवाय बीजांकुराचा वाणी आदी खुरपड्या फडशा पाडीत आहेत. हे नवे संकट शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. मेळघाटातील पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना व्यवस्थापन करावे लागत आहे.
बॉक्स
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत सोयाबीनची पेरणी
मूग, उडीद आदी अल्प कालावधीतील पिके या आठवड्यानंतर बाद होतील. मात्र, १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. अधिकतम त्यानंतरही एक आठवड्यापर्यंत करता येईल. जुलैअखेरपर्यंत कपाशीची पेरणीदेखील करता येणार आहे. तूर त्यानंतरही पेरणी करता येईल, अशा परिस्थितीत सोयाबीनमध्ये आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.
बॉक्स
पावसाअभावी वैरणटंचाई
पावसाची ओढ असल्याने सध्या वैरणटंचाईचे सावटदेखील पशुपालकांवर आहे. सोयाबीनचे कुटार अलीकडे ब्रिकेटसाठी वापरल्या जात असल्याने वैरणटंचाईत भर पडली आहे. त्यातच सोयाबीनच्या हंगामात परतीच्या पावसामुळे कुटार खराब झालेले असल्याने पशुपालकांजवळ साठवणूक केलेली वैरण नाही. पावसाअभावी चारा उगवला नाही. त्याची वाढ झालेली नाही.
कोट
३० तारखेपर्यंत विखुरल्या स्वरूपात पाऊस झालेला आहे व जमिनीत आर्द्रता असल्याने पिकांना धोका नाही. मात्र, ३० जूननंतर पावसाचा खंड असल्याने त्यानंतर काही पेरण्या उलटण्याची शक्यता आहे.
विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
पाईंटर
सध्या झालेली पेरणी : ५,२०,२८१ हेक्टर
सोयाबीनचे क्षेत्र : २,०८,२०८ हेक्टर
कपाशीचे पेरणी क्षेत्र : १,८१,८६५ हेक्टर
एकूण टक्केवारी : ७४.४५ टक्के
आतापर्यंत पाऊस : २४४.६ मिमी