पिके कोमात, चिंतेचे ढग; पेरण्या धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST2021-07-08T05:00:00+5:302021-07-08T05:00:35+5:30
जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त झाला. ९ व ११ जूनला जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनीदेखील मृग नक्षत्रात पेरण्यांना सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. पाऊस फक्त काही भागात विखुरल्या स्वरूपात झाला. जमिनीत आर्द्रता असल्याने पिकांना काही काळ तग धरली. आता पावसात खंड असल्याने व तापमानात वाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत.

पिके कोमात, चिंतेचे ढग; पेरण्या धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १ जुलैपासून पावसाची दडी असल्याने सुरुवातीला पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी कोमात गेली आहेत. याशिवाय पावसाच्या खंडाअभावी या आठवड्यात झालेल्या ९३ हजार हेक्टरपैकी किमान ५० हजार हेक्टरमधील पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ७ जुलैनंतर पावसाची शक्यता सांगितली असली तरी एकूण स्थिती पाहता चिंतेचे ढग दाटून आले आहेत.
जिल्ह्यात १० जूनला झालेल्या सार्वत्रिक पावसानंतर मान्सूनचे वेळेआधी आगमन झाल्याची शुभवार्ता हवामान विभागाने दिली. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त झाला. ९ व ११ जूनला जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनीदेखील मृग नक्षत्रात पेरण्यांना सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. पाऊस फक्त काही भागात विखुरल्या स्वरूपात झाला. जमिनीत आर्द्रता असल्याने पिकांना काही काळ तग धरली. आता पावसात खंड असल्याने व तापमानात वाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे बळराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही भागातील जमिनीत ओल असल्याने बीजांकुर निघाले. मात्र, कमी आर्द्रतेच्या भागातील सोयाबीन बियाणे जमिनीत कुजायला लागले आहे.
कोवळ्या पिकांवर माकडांसह वन्यप्राण्यांचे संकट
सुरुवातीच्या टप्प्यात पेरणी झालेली पिकांना माकडांच्या टोळ्या व काही भागात हरिण, निलगाय आदी फस्त करीत आहेत. याशिवाय बीजांकुराचा वाणी आदी खुरपड्या फडशा पाडीत आहेत. हे नवे संकट शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. मेळघाटातील शिवारांमध्ये पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना व्यवस्थापन करावे लागत आहे.
पावसाअभावी वैरणटंचाई
पावसाची ओढ असल्याने सध्या वैरणटंचाईचे सावटदेखील पशुपालकांवर आहे. सोयाबीनचे कुटार अलीकडे ब्रिकेटसाठी वापरली जात असल्याने वैरणटंचाईत भर पडली आहे. त्यातच सोयाबीनच्या हंगामात परतीच्या पावसामुळे कुटार खराब झालेले असल्याने पशुपालकांजवळ साठवणूक केलेली वैरण नाही. पावसाअभावी आतापर्यंत शिवारात, धुऱ्यावर चाऱ्याची उगवण झालेली नाही.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत सोयाबीनची पेरणी
मूग, उडीद आदी अल्प कालावधीतील पिके या आठवड्यानंतर बाद होतील. मात्र, १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. अधिकतम त्यानंतरही एक आठवड्यापर्यंत करता येईल. जुलैअखेरपर्यंत कपाशीची पेरणीदेखील करता येणार आहे. तूर त्यानंतरही पेरणी करता येईल, अशा परिस्थितीत सोयाबीनमध्ये आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.