सिमेंटच्या बनावट बिल प्रकरणी फौजदारी
By Admin | Updated: July 17, 2015 00:14 IST2015-07-17T00:14:17+5:302015-07-17T00:14:17+5:30
बनावट बिलाने सिमेंट मागविल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित दुकानदाराविरुद्ध फौजदारी दाखल केली आहे. ....

सिमेंटच्या बनावट बिल प्रकरणी फौजदारी
बडनेरा पोलिसांत तक्रार : आयुक्तांचा निर्णय
अमरावती : बनावट बिलाने सिमेंट मागविल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित दुकानदाराविरुद्ध फौजदारी दाखल केली आहे. हे सिमेंट बाजारात विक्री करता येत नसल्याने ते कसे मागविण्यात आले, हा प्रश्नच आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांत जानवाणी सिमेंट एजन्सीचे शाहरुख जानवाणी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महापालिका एलबीटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार बडनेरा शहरातील यवतमाळ वळणमार्गावर एम.एच.२९ टी- २११७ या क्रमांकाचा ट्रक उभा होता. हा ट्रक संशयास्पद असल्याची कुणकुण एलबीटी विभागाला लागताच ट्रक चालकाकडून मालाचे बिल मागण्यात आले. या ट्रकमध्ये सिमेंट असल्याचे स्पष्ट झाले. यवतमाळ येथील ‘शहजाद रोड लाईन्स’ या नावाने पावती होती. एल.आर. क्रमांक ०३० असे नमूद असलेल्या पावतीवरी ४४० सिमेेंटची पोती जानवाणी सिमेंट एजन्सीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ४४० सिमेंटची पोती असलेला ट्रक महसूल रक्षणार्थ महापालिकेने ताब्यात घेतला.
ताब्यात घेतलेली सिमेंटची पोती परत मिळविण्यासाठी जानवाणी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था विभागात अर्ज केला. परंतु या अर्जासोबतचे बिल हे नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील रामप्रसाद बागमल मोदी यांच्या नावे होते. हा माल हा एक लाख १० हजार रुपयांचा असल्याचे बिलावरुन स्पष्ट झाले. परंतु या बिलाची तपासणी केली असता ते बिल बनावट असल्याचे एलबीटी विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. ट्रकमधील सिमेंटच्या पोत्याची तपासणी केली असता वेगळेच सत्य बाहेर पडले. या सिमेंट पोत्यावर ‘नॉट फॉर सेल’ असे अंकित होते. त्यामुळे हे सिमेंट बाजारात विकण्यास मनाई असताना ते विकण्यास आले. ही बाब कर बुडविण्यासाठी करण्यात आल्याचे उपायुक्त विनायक औगड यांच्या निदर्शनास आले.