Crime : ती रस्त्यावरील पुरुषांना घरी बोलवायची.. अमरावतीतील अनेक वर्षांपासूनच्या देहव्यापार अड्ड्यांवर धाड
By प्रदीप भाकरे | Updated: October 9, 2025 20:31 IST2025-10-09T20:18:48+5:302025-10-09T20:31:48+5:30
शहर गुन्हे शाखेची कारवाई; एकाच दिवशी पिटाअंतर्गत दोन गुन्हे : न्यू हनुमान नगर, शांतीनगर येथील कुंटणखान्यावर धाड

Crime : She used to call men on the street to her home.. Raid on prostitution dens in Amravati that had been operating for many years
अमरावती : शहर गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. ९) दुपारी फ्रेजरपुरा व गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या दोन कुंटणखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कुंटणखाना चालवणाऱ्या एक पुरुष व दोन महिलांसह अन्य सात महिलांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. दोन्ही घटनांमध्ये गाडगेनगर व फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात ‘पिटा’नुसार (अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६) दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले. डमी ग्राहक पाठवून ती मेगा कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, ३० सप्टेंबर रोजीदेखील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिटान्वये कारवाई करण्यात आली होती.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चव्हाण यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अमोल कडू व महेश इंगोले यांच्या पथकाने ९ ऑक्टोबर रोजी गाडगेनगर हद्दीतील न्यू हनुमाननगर, पॅराडाइज कॉलनीजवळील एका घरावर धाड घातली. एक महिला ही लोकांना घरी बोलावून देहव्यापार करीत असल्याची माहिती होती. तेथून देहव्यापार चालविणाऱ्या महिलेसह तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. तेथून आक्षेपार्ह वस्तू तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्या महिलांविरुद्ध गाडगेनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
शांतीनगरचा कुंटणखाना चालवत होता
अनिलसोबतच गुन्हे शाखेच्या पथकाने ९ ऑक्टोबर रोजी फ्रेजरपुरा हद्दीतील शांतीनगर येथील एका घरावर धाड घातली. तेथून देहव्यापार चालविणाऱ्या अनिल भिवाजी पनवार (५५, रा. शांतीनगर) व एक महिला तसेच ग्राहक नीलेश बाबूराव खडसे (३८, रा. महादेवखोरी) यांच्यासह देहव्यापार करणाऱ्या पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले. ती महिला व दोन इसमांविरुद्ध फ्रेजरपुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बऱ्याच वर्षांपासून अवैध व्यवसाय
दोन्ही ठिकाणी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींकडून गुन्हे शाखेने माहिती घेतली असता, ते मागील बऱ्याच वर्षांपासून कुंटणखाना चालवित असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. देहव्यापार करणाऱ्या आरोपींच्या मोबाइल क्रमांकाची पडताळणी करून त्यांना मदत करणाऱ्या व त्यांच्याकडे ग्राहक म्हणून जाणाऱ्या इसमांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे.
"अमरावती शहरात जेथे कुठे कुंटणखाना वा वेश्याव्यवसाय चालू असल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. दोन्ही प्रकरणांमध्ये पिटा अन्वये गुन्हा दाखल केला."
- संदीप चव्हाण, प्रमुख, गुन्हे शाखा