अमरावती जिल्ह्यात क्रिकेट बेटिंग; कनेक्शन सिराज मेमनशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 20:44 IST2023-05-02T20:43:33+5:302023-05-02T20:44:32+5:30
Amravati News ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतवाड्यात चालणाऱ्या आयपीएलवरील जुगाराचा पर्दाफाश केला.

अमरावती जिल्ह्यात क्रिकेट बेटिंग; कनेक्शन सिराज मेमनशी!
अमरावती: ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतवाड्यात चालणाऱ्या आयपीएलवरील जुगाराचा पर्दाफाश केला. ३० एप्रिल रोजी केलेल्या या कारवाईदरम्यान प्रतिक किशोरसिंह ठाकुर (२६, रा. अचलपूर) याला अटक करण्यात आली. तर संकेत शरद शेळके (२४,रा. परतवाडा) व सिराज मेमन, (रा. इतवारा बाजार, अमरावती) हे दोन आरोपी फरार आहेत. यातील सिराज मेमन हा अमरावती शहर पोलिसांना देखील हवा आहे. एलसीबीने केलेल्या कारवाईत थेट सिराज मेेमनचे नाव उघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक तपन कोल्हे यांना आयपीएल क्रिकेटवर चालणाऱ्या जुगारावर प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने एलसीबीचे पथक ३० एप्रिल रोजी परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करित असतांना प्रतिक ठाकुर हा त्याच्या मोबाईल वर क्रिकेट सट्टयाचे ॲप व आयडी लिंकव्दारे सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता तो मोबाईल ॲप व आयडी लिंकव्दारे क्रिकेट सट्टा खेळत असताना आढळून आला.
सट्टयाचा हिशेब मेमनकडे
ते ॲप व आयडी लिंक आपल्याला परतवाड्याचा फरार आरोपी संकेत शेळके व अमरावतीच्या सिराज मेमन यांनी उपलब्ध करून दिली. त्या दोघांच्या सांगण्याप्रमाणे आपण सट्टा चालवित असल्याची कबुली प्रतिक ठाकूर याने दिली. सट्टयाचा संपुर्ण हिशोब आपण मुख्य सट्टा बुकी सिराज मेमन याच्याकडे देतो, या कबुलीवरून मेमनविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून सट्टयासाठी वापरण्यात येणारा मोबाईल व नगदी असा एकुण ११,६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.